दीपावली - 2016         

 

दसऱ्या पाठोपाठ येणारा आपला आवडता सण म्हणजे ‘ दिवाळी ‘. दिव्यांची  रोषणाई , मातीचे किल्ले , फटाके फोडणे कलाकुसरीचे आकाश-कंदिल ,पणत्या ,मनमोहक रांगोळ्या ,किंमती वस्तूंची खरेदी ,आप्त-स्नेही मंडळींबरोबर फराळ-मिष्टान्नांची मेजवानी ,शुभेच्छा अशा अनेक गोष्टी आपण आंनदाने आणि उत्साहाने करतो .

अलिकडे "दिवाळी-पहाट "सारख्या  सुश्राव्य  संगीत ,किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांची  पण ह्या आनंदात हजेरी असते. सगळीकडे सकारात्मक आणि आनंददायी ऊर्जा निर्माण करणारा हा आपला जगप्रसिद्ध सण आहे .

आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया ह्या कालावधीत प्रत्येक दिवस  वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो .

ह्या कालावधीत दररोज दीप लावले असता त्या घरी लक्ष्मी सर्वकाल  स्थिर रहाते, असे मानले जाते.  

 

ऑक्टोबर २६, बुधवार   :    आश्विन वद्य द्वादशी ---वसु बारस \गोवत्स द्वादशी  

संध्याकाळी गायीची पाडसा सोबत पूजा केली जाते . आपल्याला दूध-दुभते देणारी गाय ( कामधेनू  )  आणि  शेतीच्या कामासाठी उपयोगी असणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते.  

 

ऑक्टोबर २७,गुरुवार  :  धनत्रयोदशी ,  धनतेरस , धन्वंतरि जयंती 

धनतेरस- धनरूपी लक्ष्मीची प्रार्थना करून नीतीने धन संचय करण्याचा संकल्प करावा.

यमदीप दान- मृत्युलोकाचा अधिपती यम आहे त्याची अवकृपा होऊ नये म्हणून त्याच्या नावाने हा  हळद , कणकीचा   दिवा सांयकाळी  दक्षिणेकडे ज्योति  करून  घराबाहेर ठेवतात. दिव्याची हळद-कुंकू ,फुले वाहून  पूजा करतात.

"मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह त्रायोद्श्याम दीप दानात सूर्यज :प्रीयतां  मम .

हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा .  अपमृत्यु येवू नये म्हणून प्रार्थना करावी.

 धन्वंतरि जयंती-

"सुधा कुंभ धरो हस्ते श्रीशो धन्वंतरी सदा ।  ज्ञान मुद्रा युतशचैवम तस्मै भगवते नमः II

हा श्लोक म्हणून उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी धन्वंतरीची-देवांच्या वैद्याची प्रार्थना करतात. 

 

 

ऑक्टोबर २९, शनिवार  :  नरक चतुर्दशी , यमतर्पण ,अमावास्या , लक्ष्मी पूजन

नरक चतुर्दशीआश्विन वद्य चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि बंदिवासात असलेल्या स्त्रियांना मुक्त केले.  त्या आनंदा प्रित्यर्थ प्रजेने नगरात रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या मार्गांवर  दिवे लावून  श्रीकृष्णांचे स्वागत केले .अभ्यंग स्नान आणि पक्वांन्नांचे भोजन केले अशी  कथा आहे. त्या आठवणी साठी नरक चतुर्दशीला पहाटे लवकर उठून  उटणे,  सुगंधी तेल लावून स्नान करतात.

यमतर्पण

अपमृत्यू  येऊ नये म्हणून वडिल असणाऱ्यांनी पाण्यामध्ये अक्षता घालून आणि वडिल नसणाऱ्यांनी पाण्यामध्ये काळे तीळ घालून पुढील यम आणि यमाच्या सहाय्यक देवतांची नावे घेऊन अर्धे स्नान झाल्यावर शक्यतो तांब्याच्या ताम्हणामध्ये  तर्पण करावे . तर्पण झाल्यावर  स्नान पूर्ण  करावे.

१)  यमं तर्पयामि , २) धर्मराजमं तर्पयामि,३) मृत्यु   तर्पयामि ,४) अंतकं   तर्पयामि, ५) वैव स्ततं  तर्पयामि६)कालं तर्पयामि,  ७) सर्वभूतक्षयकरं तर्पयामि ८) औदुंबरं   तर्पयामि ९) दधनं    तर्पयामि ,१०)नीलं   तर्पयामि, ११) परमेष्ठीं  तर्पयामि, १२)वृकोदरं  तर्पयामि, १३) चित्रं   तर्पयामि, १४) चित्रगुप्तम   तर्पयामि.

नंतर दक्षिणेकडे तोंड करून पुढील शलोक दहा वेळेला म्हणावा .

यमोनिहंता  पितृधर्मराजो  वैवस्वतो दंडधरश्च  काल: भूताधिपो  दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जपंति  ।। 

सुरक्षिततेसाठी प्रार्थना करावी .

घरातील जेष्ठ सुवासिनी सर्वांना औक्षण करते. . सूर्योदयापूर्वी देवपूजा करतात . नवे कपडे ,दागिने घालून देवालयात जातात .

मित्र मंडळींसोबत फराळ, भोजन करतात.

लक्ष्मी पूजन

संध्याकाळी  सुमूहर्तावर "लक्ष्मी- कुबेर  पूजन "  करतात .

प्रथम गणपतीची पूजा करावी . 

पाटावर किंवा चौरंगावर तांदुळाच्या राशीवर ताटात  नाणी ,सोने,चांदी, रत्ने  --अलन्काराच्या रूपात लक्ष्मीची  स्थापना करावी. श्री सूक्त  म्हणून मनोभावे  लक्ष्मीची पूजा करावी . धणे ,गूळ , साळीच्या लाह्या , बत्ताश्याचा नैवेद्य दाखवावा .  नविन वर्षात लक्ष्मीची कृपा राहावी  म्हणून प्रार्थना करावी .

ह्या दिवशी नवीन केरसुणी आणून पूजा केली जाते .

अलक्ष्मी नि:सारण --अलक्ष्मी म्हणजे दैन्य -दारिद्र्य आणि नि:सारण म्हणजे बाहेर टाकणे .

घरातील अमंगल ,घाण बाहेर  काढल्यावर स्वच्छ ,सुशोभित ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते .

कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी लोकांचे नवे वर्ष सुरू होते . म्हणून ते  ह्याच दिवशी  हिशेबाच्या वह्यांची पूजा करतात .

 

 

ऑक्टोबर ३१, सोमवार     :   बलि प्रतिपदा, गोवर्धन पूजा आणि अन्नकुट -- दिवाळी पाडवा  

बलि प्रतिपदा- प्रल्हादाचा नातू , विरोचनचा  पुत्र  "बली " हा एक पराक्रमी श्रीमंत राजा होऊन गेला .त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर देवांना त्रास देऊन लक्ष्मीला कोंडून ठेवले होते.

तेंव्हा भगवान विष्णूंनी वामनाचे रूप धारण केले आणि ते बटूच्या वेशात बलीराजा  कडे गेले व फक्त तीन पावले ठेवता येतील एवढी भूमि दान करण्याची विनंती केली . उदार बलीने ते मान्य केल्यावर वामनाने एकाएकी प्रचंड रूप धारण केले . एका पावलाने पृथ्वी आणि एका पावलाने स्वर्ग व्यापला . तिसरे पाऊल ठेवण्यास जागा नसल्याने ते बलीच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळात दडपले. पण त्या वेळेस  बलीच्या विनंती वरून त्याला बली प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील असा  वर विष्णूंनी दिला. अशी कथा आहे.

 म्हणून ह्या  दिवशी बलीची पूजा करण्याची प्रथा आहे.

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो ।भविष्येन्द्रसुराराते पुजेयं  प्रतिगृह्यतां  ।।

हा श्लोक म्हणावा तसेच गरजू लोकांना  यथाशक्ति दान केले असता विष्णूला संतोष होतो असे मानले जाते .  

दिवाळी पाडवा- ह्या दिवशी  विक्रम संवत सुरु होते. साडे तीन मुहूर्तांपैकी  दिवाळी पाडवा हा एक सुमुहूर्त आहे.

 गोवर्धन पूजा आणि अन्नकुट- भगवान श्रीकृष्णांची पूजा  करतात व अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांचा नैवेद्य दाखवतात .

दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला औक्षण करते आणि पती पत्नीला भेट वस्तू देतो .  

 

 

नोव्हेम्बर, मंगळवार :  कार्तिक शुद्ध द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज  

यम द्वितीया / भाऊबीज - यमराजाने ह्या दिवशी यमुना ह्या आपल्या बहिणीकडे जाऊन भोजन केले म्हणून ह्या दिवसाला यमद्वितीया असे नाव आहे . ह्या दिवशी बहिणआपल्या भावाला बोलावून पाहुणचार करते  आणि भाऊ बहिणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून भेट वस्तू देतो .

पौराणिक कथा , रूढी ,परंपरां ह्यांच्या  माध्यमातून  देशकालानुसार  ह्या सणाद्वारे   स्नेही ,आप्त ,नात्यांमध्ये आपुलकी आणि प्रेम भाव  जपायचा आहे .आरोग्य वर्धन आणि नीतीने धन मिळवण्यासाठी संकल्प करायचे आहेत .जेष्ठ, जाणकारांना वंदन करून मार्गदर्शना साठी आशीर्वाद घ्यायचे आहेत.  ज्ञान ,कला गुणांच्या विकासासाठी प्रकाश दायी दीपांचा दीपोत्सव साजरा करायचा आहे .

निरामय आरोग्य आणि समृद्ध आयुष्यासाठी, श्री गणेश याग परिवारातर्फे  सर्वांना  दिवाळीच्या  मनःपूर्वक शुभेच्छा !

 

शुभ दीपावली.