शारदीय नवरात्री उत्सव -सौ जयश्री काजरेकर

 

आपल्या संस्कृती  मध्ये उत्सव, व्रते, सण साजरे करण्यामागे विशेष प्रयोजन आहे. पौराणिक कथा, धार्मिक रूढी आणि व्यक्तिगत तसेच सामाजिक हिताचा विचार त्यामध्ये सामावलेला आहे . पारंपरिक पद्धतीने केवळ अनुकरण करण्या पेक्षा त्याबद्दल उपलब्ध असणारी माहिती समजली तर सण,उत्सव वगैरे साजरे करण्यात उत्स्फूर्त सहभाग आणि आनंद मिळेल.

ह्या वर्षी शनिवार १ ऑक्टोबर पासून  " नवरात्री उत्सव “ सुरु होत आहे .  शरद ऋतू मध्ये, अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून, अश्विन शुद्ध नवमी पर्यंत हा उत्सव असतो. चैत्र, माघ वगैरे महिन्यांमध्ये ही  नवरात्र असते, परंतु हे शरद ऋतू मधील नवरात्र म्हणून ' शारदीय नवरात्र '.

आदिशक्ति  दुर्गा देवीने महिषासुरादि  आसुरांशी  ९ दिवस घनघोर युद्ध करून त्या आसुरांचा वध केला ही  मार्कंडेय पुराणात कथा आहे. त्या घटनेच्या आठवणी निमित्त  हा  नवरात्र  उत्सव आहे. जेंव्हा  तामसी, आसुरी, क्रूर लोक प्रबळ होतात आणि सात्विक, धर्मनिष्ठ  प्रामाणिक लोकांना त्रास देतात, तेव्हा देव, देवता धर्म संस्थापने करता पुन :पुनः अवतार घेतात. ( गीता , अध्याय ४था श्लोक ७,८ ).

महिषासुर दैत्याने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. देव देवता, ऋषी मुनी , साधू संत , सज्जनांना त्रासवून सोडले होते. अनेक देवांचे अधिकार महिषासुराने स्वतः कडे घेतले होते. या क्रोध कारक परिस्थितीत ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या मुखापासून तसेच इंद्रादि  देवतांच्या शरीरातून प्रचंड तेज बाहेर पडले आणि त्या अतुल  तेजाने स्त्री रूप धारण केले, तीच ही आदिशक्ति   दुर्गा देवी होय. या तेजोमय दुर्गा देवीच्या दर्शनाने सर्व देवांना अतिशयआनंद झाला

दुष्ट प्रवृत्तीच्या महिषासुराशी युद्ध करण्यासाठी, त्याला पराभूत करण्यासाठी सर्व देवांनी तिला आपली आयुधे दिली. शंभू महादेवाने आपला त्रिशूल दिला, श्रीहरी विष्णूने चक्र दिले, वरुणाने शंख दिला, अग्नीने शक्ति  दिली वायूने  चाप-आणि बाण दिले, सहस्त्राक्षाने वज्र आणि ऐरावताची घंटा दिली, यमाने दंड दिला,  ब्रह्मदेवाने  कमंडलु  आणि जपमाळा दिली,  हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला, तर समुद्राने सुंदर कमळ दिले. इतर देव देवतांनीही विविध आभूषणे आणि अस्त्रे दिली. अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. नवमी  या कालावधीमध्ये दुर्गा देवीने महिषासुरादि दैत्यांशी युद्ध करून त्यांचा वध केल्याने तिला महिषासुरमर्दिनी म्हणतात. या कालावधीमध्ये ' देवीतत्त्व ' अधिक प्रमाणात कार्यरत असते. आणि ब्रम्हांडातील दुष्ट शक्तींचा दुर्गा देवी संहार करते. देवीमहात्म्य / दुर्गा सप्त शती या ग्रंथांमध्ये दुर्गादेवीच्या पराक्रमाच्या आणि महिषासुरादि दैत्यांवरील विजयाच्या कथा आहेत.

नवरात्र पूजा विधीमध्ये नैमित्तिकपूजेतील सर्व उपचारांसोबत घटस्थापना, अंकुरारोपण,अखंड नंदादीप स्थापना,देवी स्थापना, आणि मालाबंधन करण्याचा परिपाठ आहे.  या पूजा विधीत कुलाचारांना प्राधान्य असते, त्यामुळे विधींमध्ये थोडाफार फरक असू शकतो . मंत्रोपचार पूजाविधी स्वतंत्र दिलेला आहे.

 

 

१. घटस्थापना

नित्य पूजेच्या देवाच्या उजव्या बाजूस परडी मध्ये  माती पसरावी. त्यावर (वेदिकेवर) मध्यभागी हळद कुंकू लावलेला , शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलाशामध्ये  चंदन, हळद, आंबेहळद, नागरमोथा, इत्यादि औषधी वनस्पती अक्षता, फुले, दुर्वा, सुपारी, नाणे घालावे. कलशावर आंब्याची किंवा विड्याची पाने घालून त्यावर नारळ ठेवावा. आणि घटस्थापना करावी. गंध, फुल, अक्षता, हळद-कुंकू वाहून  घटाची  पूजा आणि प्रार्थना करावी.  आपआपल्या कुलाचारा प्रमाणे देवता स्थापना घटावरील ताम्हणात अथवा घटावर नारळ ठेवल्यास स्वतंत्र ताम्हणात काठोकाठ तांदूळ भरून हळदीचे अष्ट दल काढून त्यात करावी.

**देवतांकडून सात्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असणाऱ्या जिनसा घटामध्ये घालतात.

२. अंकुरारोपण

घटस्थापनेनंतर कलशाभोवती मातीमध्ये ९ प्रकारची धान्ये - सातू, साळी, गहू, मूग, हरभरे, वगैरे पेरावे. नवव्या दिवसा पर्यंत हे छोटेसे शेत छान फुलून येते.

दसऱ्याच्या दिवशी या शेतात उगवलेले तृणांकूर देवाला वाहतात आणि आप्त जनांना आपट्याच्या पानाबरोबर सोने म्हणून देतात.

** या धान्यांपैकी जे धान्य या कालावधीत जास्ती जोमाने उगवते, त्या धान्याची पेरणी करणे योग्य आहे हा संकेत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असतो.

३. अखंड नंदादीप

देवी समोर नवरात्रामध्ये अखंड नंदादीप तेवत ठेवतात. हा दीप तुपाचा असेल तर देवीच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा असेल  तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवतात. ज्या ठिकाणी हा नंदादीप ठेवायचा असतो त्या स्थळाची गंध, अक्षता, फुले वाहून पूजा करावी. आणि नंतर दीप प्रज्वलन करून दिव्याची सुद्धा पूजा करून प्रार्थना करावी.

**दीप हे तेजाचे प्रतीक आहे.  नवरात्रात वायूमंडल   शक्ती तत्त्वात्मक तेजाने भारित असल्यामुळे सतत तेवत असलेल्या दीपज्योतीकडे तेज-तत्त्वात्मक लहरी आकर्षित होतात. अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत वास्तव्य राहते. दीप हे प्रकाशाचे / ज्ञानाचे प्रतीक आहे. अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करण्यासाठी याचे महत्व आहे.

४. देवता स्थापना

कलशावर अथवा उच्चासनावर लाल रेशमी वस्त्र घालून पूर्ण पात्रामध्ये ,काठोकाठ तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल कमल काढून त्यावर देवता स्थापना करतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपिणी दुर्गादेवी तसेच कुलदेवतेची स्थापना करतात . नवदुर्गा  ही  दुर्गादेवीच्या ९ नांवांनी संबोधिली जाते. ही  दुर्गेची ९ रूपे - १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी, ३. चंद्रघंटा, ४. कूष्मांडी, ५.स्कंदमाता, ६. कात्यायनी , ७. कालरात्री , ८.महागौरी, ९. सिद्धीदात्री.  अशी आहेत.

 

 

५. मालाबंधन

घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानांची माला बांधली जाते. तसेच ९  दिवस विविध फुलांची माळ घटावर लोंबती बांधली जाते.

घटस्थापनेदिवशी यथाविधी  षोडशोपचार पूजा केल्यानंतर , नवरात्र संपेपर्यंत  देवी, घट, आणि नंदादीप त्यांच्या जागेवरून हलवायचे नसतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा ,नैवेद्य ,आरती वगैरे उपचार मनोभावे करतात.

देवीची  ५ व्या दिवशी उपांग ललिता,

७ व्या दिवशी विद्या आणि कलांची देवता सरस्वती         

८ व्या दिवशी संपत्ती आणि ऐश्वर्याची देवता लक्ष्मी आणि

९ व्या दिवशी शक्ति आणि विजयाची देवता दुर्गा  या विशेष स्वरूपात पूजा केली जाते.

देवीमाहात्म्य ( सप्तशती पाठ ) , श्री सूक्त, ललिता सहस्र नाम, देवी सहस्र नाम, कुंकूमार्चन, जप, हवन  अशा नानाविध उपासना करण्याचा परिपाठ आहे.  तसेच कुमारिका आणि सुवासिनी पूजनाचे महत्व आहे. 

 या काळात भोंडला / हादगा, खेळला जातो. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्या भोवती फेर धरून भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हटली जातात. बरेच ठिकाणी ' गरबा' खेळला जातो. टाळ्यांच्या लयबद्ध ठेक्यात किंवा टिपऱ्यांच्या तालावर   देवीचे गुण गान करणारी गाणी गायली जातात .  सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे दुर्गा देवीची मूर्ति  स्थापन करून दुर्गा पूजा उत्सव ही  मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

आदिमाया दुर्गादेवी अनेक रूपांमधून ब्रह्माण्डातील दुष्ट शक्तींचा नाश करून, सज्जनांचे रक्षण, मंगल, कल्याण करणारी शक्ति आहे. त्या शक्तीच्या उपासनेसाठी हा नवरात्र उत्सव .

 

विजया दशमी - दसरा

 

अश्विन शुध्द दशमी म्हणजे नवरात्री संपल्यानंतरचा हा दिवस. नवरात्रीच्या कालावधीत दुर्गा देवीने आसुरांशी युध्द  केले आणि महिषासुरादि  दैत्यांचा वध केला. तसेच श्री. रामचंद्रांनी रावणाशी युद्ध केले आणि रावण वध केला. अज्ञात वासात असलेल्या पांडवांनी ह्याच कालावधीत विराट राजाच्या बाजूने कौरवांशी युद्ध करून त्यांना पराभूत केले तो हाच दिवस.

दुष्ट, दुर्जनां विरुद्ध संघटित शक्तीने लढा देऊन अंती विजय मिळाल्याचा आनंद प्रेरणादायी असतो. ह्या विजय कथांच्या आठवणीं प्रित्यर्थ दसऱ्याच्या ह्या सणाला विजया दशमी असे संबोधले जाते.

साडे तीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. ह्या दिवशी नवीन उपक्रमांना सुरुवात करतात. तसेच जे जे कोणी ज्या ज्या क्षेत्रात काम, उद्योग करतात ते ते सर्व जण आपल्या कामी येणाऱ्या उपकरणांची, वाहनांची पूजा करतात. विद्यार्थी सरस्वती पूजन करतात.

हा दिवस सीमोलंघनाचा आहे. आपण आजवर जे कार्य करत असतो त्यामध्ये अजून पुढची प्रगती करण्याचा निश्चय ह्या शुभ मुहूर्तावर केला जातो.