मकर संक्रांत 2017 - " तिळगूळ घ्या गोड गोड बोला “

 

मकर संक्रांत    " तिळगूळ  घ्या गोड गोड बोला “

मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व आप्त, स्नेही परिचितांना तिळगूळ देऊन गोड बोलण्याचे मनोगत व्यक्त केले जाते. सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तो दिवस म्हणजे ' मकर संक्रांत'.  उत्तरायण सुरु होताना सर्वात मोठी रात्र संपलेली असते. अंधार संपून प्रकाशाचे साम्राज्य सुरु होत असल्याने उत्तरायण हे पवित्र मानले जाते. म्हणून त्याला ' देवायन ' असेही नाव आहे. उत्तरायण सुरु झाल्यावर येणारा सण मकर संक्रांत आहे. नैसर्गिक, भौगोलिक वातावरण, सांस्कृतिक परंपरा आणि पौराणिक कथा वगैरे गोष्टींना अनुसरून हा सण आनंदात साजरा केला जातो.   

संक्रांतीच्या अदल्या दिवशी ' भोगी ' आणि  नंतरच्या दिवशी ' किंक्रांत हे दिन विशेष आहेत . भारतीय हवामानानुसार शरद ऋतु पासून सुरु झालेली थंडी चढत्या क्रमाने हवेत गारठा वाढवित असते. शेत मळ्यांमध्ये धान्य, ऊस, हरभरा, आणि  भाज्या, मुबलक  प्रमाणात तयार झालेल्या असतात , त्यामुळे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी , लोणी आणि वांगी -पावटा -गाजर -मटार अशा अनेक भाज्या एकत्र करून केलेली ' लेकूरवाळी ' भाजी  मुगाच्या डाळीची खिचडी तूप असा जेवणाचा बेत असतो.  संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी -तूप असा बेत करतात . संक्रांतीच्या दिवसा पासून रथ सप्तमी पर्यंत तिळगूळ - हलवा एक मेकांना देऊन आपण शुभेच्छा देतो . थंडीपासून बचाव करण्यासाठी शरिरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थांची ही आहार योजना आहे. या सणाला काळे कपडे परिधान करण्या मागे सुद्धा ऊर्जा मिळवण्याचाच हेतू असावा.

स्निग्धता वाढवणारे तीळ  स्नानाच्या पाण्यात घालणे , तिळाचे उटणे वापरणे, तिळाचे हवन करून होम करणे , तीळ युक्त जलाने तर्पण करणे आणि तीळ-दान करणे , अशी प्रथा आहे. मकर संक्रांत ते रथ सप्तमी हा कालावधी " पर्व काळ " असल्याने साधने साठी पूरक असतो. तसेच या कालावधीत केलेले दान विशेष फलद्रूप होते. हळदी कुंकू, तिळगूळ समारंभ, वगैरे उत्साहात साजरे केले जातात. गुजरात मध्ये या कालात आकाशात वैविध्य पूर्ण पतंग उडवण्याची प्रथा आहे. तिळामधील  स्नेह- स्निग्धता आणि गूळ किंवा साखरेतील माधुर्य -गोडवा नाते संबंधात जपण्याची जाणिव जोपासली जाते. महिला वर्गाच्या कल्पकतेला वाव दिला जातो . संक्रांत सणाच्या  निमित्ताने हलव्याचे विविध प्रकार , हलव्याचे दागिने, कलात्मक पिशव्या भेटकार्डे , कलाकुसरीने साकारली जातात.

ह्या सणाबद्दल पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहेत . परमेश्वराने देवीचे रूप घेऊन " संकरासूर " दैत्याचा वध करून सर्वांना निर्भयतेने राहण्यासाठी सहाय्य् केले. अशी कथा आहे. त्याला अनुसरून पंचागा मध्ये संक्रांतीचे स्त्री रूपात वर्णन केलेले असते . भगीरथ राजाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती . शिव शंकराच्या कृपा प्रसादाने त्याची तपश्चर्या फलद्रूप झाली  आणि गंगा पृथ्वीवर अवतरली. संक्रांतीच्या पुण्य दिवशी भगीरथ राजाने      " गंगासागर " कपिलमुनी आश्रम येथे त्याच्या पूर्वजांसाठी तर्पण केले असा उल्लेख आहे. 

रथसप्तमीच्या दिवशी तुळशी वृन्दावनाजवळ पाटावर रक्त चंदनाने सात घोड्यांच्या रथा मध्ये विराजमान झालेल्या सूर्याची प्रतिमा काढून, तांबडी फुले, तांबडे गंध वाहून सूर्याची पूजा करतात, खिरीचा नैवेद्य दाखवतात.

आपल्या बहुतेक सर्व सण, उत्सवांना शास्त्रीय आधार आहे . तुळस ही अशी वनस्पस्ती आहे जी उच्छवासा वाटे मुबलक प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित करते . हवेतील प्रदूषण कमी करून वातावरण शुद्ध करण्यासाठी मदत करते. ह्या वनस्पतीच्या सान्निध्यात मनोभावे पूजा करताना जी एकाग्रता आवश्यक आहे ती निर्विकार मनोधारणेसाठी पोषक आहे . सात्विक पोषण मूलये असलेल्या खिरीचा प्रसाद हा आरोग्य वर्धक आहे. थोडक्यात शुद्ध वातावरण, निर्विकार स्वस्थ मन आणि सात्विक आहार ही त्रिसूत्री सांभाळून बलोपासना -सूर्योपासना केली तर आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभेल हे दाखले पुराण काळा पासून आपल्याला मिळालेले आहेत.

आज बदलत्या देश कालानुरूप विज्ञानाच्या निकषावर सिद्ध झालेल्या गोष्टींचा सारासार विचार करून सण साजरे केले तर संस्कृती  जपली जाईल आणि मानवी जीवन निरामय आणि सुकर होईल. संक्रांतीचे महत्व जाणून सूर्योपासना, सामूहिक सूर्य नमस्कार संकल्प , गायत्री  मंत्र पठण असे कार्यक्रम आज केले जातात . श्री समर्थ रामदास स्वामींसारख्या धर्म रक्षणार्थ झटणाऱ्या संतांनी आरोग्य वर्धनासाठी सूर्योपासनेचे महत्व सांगितले आहे. सर्वांच्या निरामय, स्वस्थ आरोग्यासाठी ते वरदानच ठरावे .

श्री गणेशयाग परिवारातर्फे सर्वांना संक्रांतीच्या स्नेहपूर्ण शुभेच्छा .

 " तिळगूळ  घ्या गोड गोड  बोला

 

- सौ. जयश्री काजरेकर