BLOG post article - श्री गणेश उपासना

।।श्री गणेश उपासना ।।

श्री गणेश हे भक्तांचे प्रिय आराध्य दैवत आहे. श्रुतिस्मृति पुराणांच्या  मधून गणेश परब्रह्म -परमात्म्याचे प्रतीक आहे हे मानले गेलेले आहे. तो सर्व संकटे, अडचणी , विघ्नांचा हर्ता आहे आणि सर्व विद्यांचा दाता आहे. मांगल्याची वृष्टी करणाऱ्या मंगल मूर्तीची सर्व कार्यारंभी, अन्य देवतांच्या पूजारंभी आद्य पूजा केली जाते. तसेच परंपराशील लेखक , कवी,कलाकार प्रथम गणेश वंदन करुनच नियोजित कामाला  सुरवात करतात . प्राचीन कालापासून ऋषि ,मुनि आचार्य ,संतांनी  "गणेश उपासनेचे" महत्व स्तोत्रे -सूक्तांच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे भक्त -भाविकांच्या मनामध्ये श्री गणेश हा विघ्नहर्ता आणि मनोवांछित कामना पूर्ण करणारा म्हणून प्रसिध्द आहे.

गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची सगुण किंवा निर्गुण उपासना करीत असतात . त्यामध्ये पूजा-अर्चा,स्तोत्र पठण अनुष्ठान ,होम-हवन ,गणेश क्षेत्र यात्रा ,दानधर्म ,उपवास ,चतुर्थी व्रत वगैरे अनेक गोष्टींचा समावेश आहे .

वैदिक कालापासून हे एकच सत्य आहे कि विश्वाचा आधार असून, विश्व निर्माण करणे, त्याचे धारण -पोषण करणे आणि त्याचा लय हि सर्व कार्ये करणारे दैवत गणेशाला मानलेले आहे. अशा आदितत्व  "श्री गणेश आणि त्याची उपासना- ह्या ज्ञान सागराची व्याप्ती अनंत आहे. ग्रंथ ,गुरु आणि सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक माहिती मिळत रहावी.

माघ वद्य चतुर्थी "शांभवी "चतुर्थीच्या निमित्ताने चतुर्थी तिथी बद्दल अगदी अल्प माहिती इथे देत आहे. गणेश उपासना आणि चतुर्थी ह्या दोन गोष्टी भक्त भाविकांच्या मनात एकत्रित श्रद्धेच्या आहेत . प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षात म्हणजे पौर्णिमे नंतर येणाऱ्या  चतुर्थीला "संकष्टी "चतुर्थी म्हणतात . अशी संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला विशेष महत्व असून त्या संकष्टीला "अंगारिका " किंवा "अंगारकी " चतुर्थी म्हणतात . ह्या बद्दल श्री गणेश पुराणात एक कथा आहे.

भरद्वाज मुनींना पृथ्वी पासून एक पुत्र झाला लाल वर्णाच्या ह्या मुलाचे नाव भौम असे होते. तो मुलगा मोठा झाल्यावर योग्य समयी मुनींनी त्याला विद्या - अभ्यास शिकवून, उपदेश देऊन गणेशाचा शुभ मंत्र  दिला. त्याने नर्मदा   नदीच्या काठावर बसून, मनामध्ये "हेरंबाचे" ध्यान करत परम मंत्राचा जप केला. माघ  वाद्य चतुर्थीला, मंगळवारी दशभुज गणपतीने त्याला दर्शन दिले आणि त्याला वर देताना असे सांगितले, "हि तिथी सर्व संकटांचे हरण करणारी आणि व्रत करणाऱ्यास इष्ट फल देणारी होईल. हे भौमा तू देवांसमवेत अमृत प्राशन करशील आणि जगामध्ये "मंगल " ह्या नावाने प्रसिद्ध होशील. तुझा वर्ण लाल आहे तू पृथ्वी पुत्र असल्याने तुला अंगारक असेही म्हणतील". अशा रितीने भौमाने -मंगलाने -अंगारकाने केलेली संकष्टी चतुर्थी "अंगारकी चतुर्थी "ह्या नावाने प्रसिद्ध झाली . प्रत्येक प्राणिमात्राला शारीरिक, मानसिक तसेच व्यावहारिक  जगामध्ये  मध्ये वेगवेगळी संकटे येतात. त्या संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते.

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला म्हणजे अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला “विनायकी” अथवा  वरद चतुर्थी म्हणतात. गणेशाचे दोन मुख्य  उत्सव- भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील गणेश जयंती हे दोन्ही शुद्ध चतुर्थीला म्हणजे विनायकी चतुर्थीला साजरे केले जातात.

गणेश उपासनेत अथर्वशीर्ष पठणाला अन्यन साधारण महत्व आहे. त्यामध्ये गणेशाचे सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन केलेले आहे. ओम नमस्ते ---- ह्या ऋचे पासून वरद मूर्तये नमः --ह्या ऋचे पर्यंत श्री गणेशाची साधना प्रतिपादन केलेली आहे . फलश्रुति मध्ये अथर्वशीर्ष  अध्ययनाचे महत्व सांगितलेले आहे.

चतुर्थ्यामनश्नन् जपति विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यम्

अर्थात- चतुर्थीच्या दिवशी मनोभावे अथर्वशीर्षाचे पठण करतो तो विद्यावान  होतो. हे अथर्व ऋषीचे वचन आहे.

आपण ज्या ठिकाणी ,ज्या मुक्कामीं राहत असतो त्या गावाचे अक्षांश -रेखांश तसेच सूर्योदय -चंद्रोदय त्यांची गती अशा गोंष्टींवर तिथि, नक्षत्र, योग वगैरे कालगणना करणाऱ्या गोष्टी अवलंबून असतात. त्या स्थानिक पंचांगाप्रमाणे असणाऱ्या तिथि प्रमाण मानून व्रते, सण, उत्सव साजरे करणे योग्य आहे .

चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची यथासांग पूजा करावी. उपलब्ध असतील तशी लाल फुले, दूर्वा, नैवेद्य, दक्षिणा, फळे अर्पण करावी. स्तोत्रे, सूक्त पठण करावीत. आरती करावी. शक्य असेल त्यांनी उपवास करावा. ह्या कर्मांबरोबर  मानसिक शुचिर्भूतता सोबत असावी. दुष्ट कर्म, निंदा-नालस्ती, इतरांचा राग-द्वेष , क्षुद्र विचारसरणी निग्रहपूर्वक टाळावी. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर पुनः गणेश पूजन, नैवेद्य, आरती करुन गणेशाला आणि चंद्राला अर्घ्य देऊन क्षमा प्रार्थना करावी.  शक्य असेल तर गायन वादन वगैरे मन तल्लिन करणारे संगीत कार्यक्रम करावेत असे पुराणांमध्ये उल्लेख आहेत.

श्री गणेश याग परिवार गेली अनेक वर्षे सातत्याने गणेश उपासने मध्ये कार्यरत आहे. देशकालाला अनुसरुन उपासने सोबत अन्य धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सर्व गणेश भक्त यशस्वी करत आहेत  आणि नवे संकल्प करत आहेत. गणेश भक्तांनीं -भक्तांसाठी सुरु केलेल्या ह्या कर्मयोगात तुमचा सर्वांचा सहभाग प्रार्थनीय आहे.

मंगलमूर्ति चरणी आपणा सर्वांसाठी मंगल चिंतन .

श्री गणेश याग परिवार.

-सौ जयश्री काजरेकर