पितृ तर्पण - ह्या वर्षी ६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर

भाद्रपद वद्य पक्ष, पितृ पंधरवडा हा जीवित नसलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा, त्यांचे स्मरण करण्याचा कालावधी आहे . आज आपण जे जीवन जगत आहोत ते सुखकर होण्यासाठी अनेक प्रकारे सहाय्य केलेल्या अनेकानेक व्यक्तींचे स्मरणपूर्वक श्राद्ध करण्याची प्रथा आहे. वैकुंठवासी गुरु, आचार्य , शिष्य, आप्त, नातेवाईक, स्नेही, तसेच देश रक्षणार्थ धारातीर्थी पडलेले लढवय्ये- सैनिक, आणि नैसर्गिक आपत्तीत स्वर्गवासी झालेल्या निरपराध जीवांनाही श्रद्धायुक्त भावनेने श्रद्धांजली अर्पण करावी.

तर्पण हा शब्द संस्कृत तृप , म्हणजे संतुष्ट करणे ह्या पासून सिद्ध झाला आहे. देव, ऋषी, पितरांसाठी मंत्रोच्चारां समवेत जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजे तर्पण होय. दरवर्षी पितृ पक्षातील या कालावधीत महालय श्राद्ध, ( पक्ष ), तर्पण, स्मरण करून इहलोक सोडून गेलेल्यांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करावी . हिंदू धर्माने सांगितलेले हे एक व्रत आहे. ह्या विधीकर्माने मृत व्यक्तींच्या वासना-इच्छा तृप्त होऊन आत्म्याला सद्गती मिळते.

 

श्रद्धया क्रियते यत्तद श्राद्धम् ।

 

मृत व्यक्तिच्या आत्म्यास तृप्ती मिळावी म्हणून श्रद्धेने, भावपूर्ण विचाराने श्राद्ध,पक्ष,तर्पण,दान,अन्नदान, अगर इतर अशी जी कृत्ये करतात त्यांना 'श्राद्ध' असे संबोधले जाते. विशिष्ट व्यक्तिंसाठी त्यांच्या मृत्यू तिथीला ते केले जाते. परंतु विवाह अथवा वास्तुशांती सारख्या मंगल प्रसंगी केले जाणारे ' नांदी श्राद्ध ' हे आपल्या अनेक दिवंगत पितरांसाठी करण्यात येणारे ' वृद्धी श्राद्ध ' आहे. तसेच महालय श्राद्ध हे देखील सर्व दिवंगतांसाठी असते. म्हणून ठराविक तिथीला करणे शक्य झाले नाही तर भाद्रपद अमावस्येला ते केले जाते. म्हणूनच या अमावास्येला ' सर्व पित्री अमावस्या ' म्हणतात . 

बहुतेक सर्व धर्मामध्ये , पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांना, आपल्या क्षेम-कल्याणासाठी झटलेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता अर्पण केली जाते. ह्या निमित्ताने येणाऱ्या पुढच्या पिढीतील सुजाणकारांना कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्व कळेल. आपल्या पूर्वजांच्या ठायी असलेल्या चांगल्या गुण स्वभावांची आठवण होईल आणि आपलेपणा बरोबर आदर भाव जपण्याची सवय होईल

.

ह्या सामाजिक बांधिलकी साठी ' श्री गणेशयाग परिवार ' गणेश उपासनेसोबत इतर कार्यक्रमांमध्ये दरवर्षी ' पितृ तर्पण ' विधीचे आयॊजन करीत असतो. ह्या वर्षी ६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर हा पितृ पक्ष कालावधी आहे. तर्पण विधी आणि अन्नदान ( कॅनेडियन फूड बँकांच्या गरजे नुसार लागणाऱ्या वस्तू ) अथवा देणगी स्वरूपात स्वीकारलेली रक्कम गरजू संस्थांपर्यंत पोचवण्याचे कार्य परिवाराचे कार्यकर्ते एकनिष्ठ पणे करीत आहेत. आपल्या सर्वांच्या वैकुंठवासीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पितृकार्य करणे हा सेवाधर्म आहे.

 

By Jayashree Kajarekar.