जगाच्याकल्याणासंतांच्याविभूती।देहकष्टवितीउपकारे।। - संत तुकाराम
अशी समाज कल्याणाची मानसिकता असणाऱ्या संतांची अनेक वर्षांची परंपरा हे भारत भूमीचे भाग्य आहे. परमार्थ मार्गावरील वाट दाखवणारे ते दीपस्तंभ आहेत. त्यांनी त्यांचे सगळेच कार्य कारुण्यमयी भावनेने केले आणि आधुनिक संत करित आहेत. इतिहासाच्या नोंदी प्रमाणे १२ व्या शतकाच्या आरंभापासून सुरु झालेले हे संतांचे प्रबोधन आज २१ व्या शतकात कसे उपयोगी पडेल, असा विचार मनात येऊ शकतो. ह्या संत संगतीचे महत्व आज आहे का?
जगाच्या पाठीवरील प्रत्येक व्यक्तिची त्या त्या व्यक्तिच्या कल्पनेप्रमाणे आनंद, किंवा विशिष्ठ गोष्ट- यश, पैसा, नावलौकिक, असे काहीतरी मिळवण्यासाठी सतत धडपड सुरु असते. आपल्याला हवी असलेली गोष्ट साध्य करण्याच्या ह्या प्रयत्नामध्ये / प्रवासामध्ये न पडता धड पणे जाण्याचा मार्ग संत दाखवतात. त्यांच्या मते ‘धर्म’ हा कोणत्या विशिष्ठ समुदायाला संबोधन करित नाही. त्या समुदायाची जी निती तत्वे ,सदाचरण प्रेरणा, धारणा असते तोच त्यांचा धर्म असतो.
तसेच वर्ण/ जाती (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र) ह्या आपल्या जन्माने मिळत नाहीत, तर आपल्या कामातील कौशल्या प्रमाणे मिळतात. चातुर्वर्ण्यं मया सृष्टयं गुणकर्म विभागशः । (भगवद्गीता अ ४--१३)
हे चार वर्ण हे मानवाच्या गुण आणि कर्म यांच्या विभागाने श्रीकृष्णांनी केले आहेत. म्हणजेच आपण जे काम करतो तो आपला खरा वर्ण असतो. असे धर्म-वर्णा विषयी व्यापक विचार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या एकाच परब्रह्माचा अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे असे संत सांगतात - ही शिकवण अनंत काला साठी उपयोगी आहे.
संतांनी स्वतः अध्यात्म जाणून जो आनंद मिळवला, जे समाधान मिळवले, ते अनुभव त्यांनी नमूद केले. अक्षर वाङ्गमय तयार केले. त्यांच्या चरित्र कथांचे वाचन, मनन, चिंतन सत्संग ,श्रवण, जे जे शक्य होईल ते ते करित ही संत संगती आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देत आली आहे. सद्य स्तिथीमध्यें आपण सगळे करोनाच्या वैश्विक संकटाने चिंता ग्रस्त झालो आहोत. ह्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी ,औषध उपाययोजने साठी शास्त्रज्ञ प्रयत्न करित आहेत. आपणही काळजी करण्यापेक्षा स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. ह्या पूर्वीही जेंव्हा अशा प्रकारे विषाणू संसर्ग किंवा साथीने हाहाकार माजवला होता त्या परिस्थितीतून बाहेर पडून जीवन पूर्ववत सुरु झाले होते. तोच विश्वास मनात ठेऊन आणि मानवतेची ,दया बुद्धीची , संकटावर विवेकाने मात करण्याची संतांची शिकवण आपण आमलात आणूया.
येत्या १ जुलै ,आषाढी एकादशी पासून दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला आपण एकेका संतांची महती थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करुया. संतांचे विचार हे अनंत कालासाठी उपयोगी आहे. त्यांचे कार्य आणि अक्षर वाङ्गमय असे एका लिखाणात सामावणे केवळ अशक्य आहे. तरीही त्या निमित्ताने आपण त्यांचे चरित्र, कथा, शिकवण समजून घेऊ आणि आजच्या काळात कसे उपयोगी पडेल ते ठरवू. हीच आपली ‘संत-संगती’. चला तर मग आपणही देवाकडे तेच दान मागुया जे संत तुकारामांनी मागितले-