वैशाख शुक्ल तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तातील एक शुभ मुहुर्त आहे. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेता युग सुरु झाले. कालविभागाच्या या प्रारंभ दिवसाला ‘युगादी' असे संबोधले जाते. 'युगादी' आणि 'कल्पादी ' म्हणजे ब्रह्म देवाच्या दिवसाचा प्रारंभ ह्याच तिथीला झाला आहे. ह्या दिवशी सुरु केलेल्या कर्माचे फल अक्षय (अविनाशी ) असते.
नॉर्थ अमेरिकन पंचांगा प्रमाणे शनिवार दिनांक २५ एप्रिल ला अक्षय तृतीया आहे.
श्री गणेशाने, व्यास मुनींनी सांगितलेले महाकाव्य महाभारत लिहायला अक्षय तृतीयेला सुरवात केली म्हणून सर्व शुभ कार्याची सुरवात ह्या दिवशी केली जाते. हयग्रीव व परशुराम अवतार या दिवशी प्रकट झाले. तसेच लिंगायत पंथाचे संस्थापक श्री बसवेश्वर ह्यांचा हा जन्म दिवस आहे. चैत्र शुद्ध तृतीयेपासुन सुरु झालेल्या चैत्र गौरी उत्सवाची याच दिवशी सांगता होते. पूर्वी स्वयंपाकघर, माजघर ह्या पलीकडील जगात एरवी फारसा वावर नसण्याऱ्या सुवासिनींना शालू, पैठण्या नेसून अलंकार घालून केसांमध्ये सुवासिक फुले माळुन “चैत्र-गौरीचे हळदीकुंकू” समारंभाला जाण्याचे हे निमित्त ह्या वासंतिक उत्सवामध्ये असे.
ह्या शुभ-मुहूर्तावर किंमती वस्तू, विशेषतः सोने खरेदी करण्याची माहिती सर्वांना आहे.
धार्मिक रुढी प्रमाणे ह्या दिवशी गंगा/समुद्र/तीर्थ स्नानाचे महत्व आहे. आरोग्य, सुख-समृद्धी प्राप्त करुन देण्याऱ्या देवतेची श्रद्धापूर्वक उपासना केली जाते. भारतातील बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्या नंतर ह्या दिवशी प्रवेश मिळतो. तसेच अयोध्ये जवळच्या कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजे ह्याच दिवशी उघडतात. वृंदावन च्या श्री बांकेबिहारींच्या मंदिरात फक्त ह्याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते.
श्री विष्णू सहित वैभव लक्ष्मीचे पूजन करण्याचे विशेष महत्व आहे. श्री कृष्ण मूर्तिला चंदनाची उटी लावली जाते. परशुराम- सप्त चिरंजीवापैकी एक आहेत त्यांना अर्घ्य दिला जातो. विष्णु पूजन, श्रीकृष्ण भगवानाला चंदन लेपन, हवन, तर्पण आणि दान करताना चित्त वृत्ती अगदी शुद्ध ठेऊन सद्भाव मनात ठेवावा. देवता आणि पूर्वजांसाठी आपण काही अर्पण करतो असे समजण्यापेक्षा त्या रूपाने भगवंतासाठी कृतज्ञतेचा, शरणागतीचा भाव मनामध्ये आणावा.
हा दिवस अधिकतर प्रमाणात कृतज्ञता दिवस म्हणणे योग्य होईल. देवता व पितरांना तीळ-तर्पण अर्पिले जाते. तसेच ज्या भूमीमधून अव्याहत पणे वनस्पती उगवत असतात त्या बद्दल ही कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवीन औषधी वनस्पतींची आणि इतरही वनस्पतींची लागवड-पेरणी केली जाते. ह्या शुभ दिवशी पेरणी केलेल्या वनस्पती चांगल्या फुला-फळांनी बहरतात असा अनुभव आहे.
राम जन्माचे सुंदर वर्णन करताना कवीवर्य ग. दि.माडगूळकरांनी असे म्हंटले आहे कि-
"चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी I गंध युक्त तरिही वात उष्ण हे किती II"
ह्या शब्द पंक्तींमध्ये चैत्र-वैशाख महिन्याच्या उष्ण वात म्हणजेच उष्णतेच्या काहिलीची जाणीव प्रकट केलेली आहे. ह्या उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यासाठीच जणु अक्षय तृतीयेला पाणपोई सुरु करणे, छत्री, चपला, पंखा, चंदन ह्या गोष्टींचे दान करणे पुण्यकारक मानले आहे. उदककुंभाचे वाळा मिश्रित पाण्याच्या घड्याचे दान करण्याची ही एक प्रथा आहे.
वास्तविक पाहता गेले काही महिने आपण सर्वजण 'करोना' संसर्गाच्या काळजीने व्यथित आहोत. त्यामुळे सण, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करणे समारंभासाठी एकत्र जमणे ह्या गोष्टी अशक्य आहेत. परंतु ह्या दिवसाचे सांस्कृतिक महत्व जाणून घेणे, परंपरांची उजळणी करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या माहितीच्या अनुषंगाने सद्यस्थिती मध्ये काहीतरी अक्षय पुण्य कर्म करणे उचित होऊ शकेल.
युगादी आणि कल्पादी कालखंडची सुरवात झालेल्या ह्या मंगल दिवसापासून करोना संसर्गाचा प्रादूर्भाव आता लवकर नियंत्रित होण्यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना करुया . आपण ज्या कृतज्ञतेच्या भावनेने पितरांचे स्मरण करतो, दान धर्म करतो तश्याच उदात्त भावनेने आज ह्या संसर्गामुळे जे अडचणीत आलेले अर्थार्थी आहेत त्यांना सहाय्य करु शकतो.
ज्या गंगा- तीर्थ स्नानाचे, अर्घ्याचे विशेष महत्व आहे ते मनामध्ये स्मरण करुन वैयक्तिक स्वछतेचे पालन आणि सामाजिक संपर्क, नियमानुसार आणि नियंत्रित करु शकतो. ज्या भूमीतून धान्य, फळे-फुले, वनौषधी आणि बऱ्याच जीवन उपयोगी गोष्टी मिळतात त्या भूमीचे, पर्यावरणाचे, जलाशयांचे प्रदूषण कमी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी अक्षय कार्यशील राहण्याचा निश्चय करु शकतो. अक्षय तृतीयेला किंमती वस्तू खरेदी करण्याची प्रथा आपण सोन्यासारखी माणूसकी जपण्याच्या प्रथेत परिवर्तित करु शकतो. थोडक्यात सनातन दाखले, प्रथा आणि सद्य परिस्थिती ह्यांची एकत्र सांगड घालून अक्षय तृतीया साजरी करुया.
भगवान श्रीकृष्णांनी युधिष्टिराला सांगितले होते की "अक्षय तृतीयेला केलेले दान आणि हवन कधीही क्षयाला जात नाही. देव आणि पूर्वज यांना उद्देशून केलेले कर्म अक्षय म्हणजे अविनाशी होते आणि दान पुण्यकारक होते."
हे दान सत्पात्री असावे. सत्कार्यासाठी झटणाऱ्या संस्था, गरजू व्यक्ति, धर्म प्रसार करण्याऱ्या संस्थांना केलेले दान श्रेष्ठ होय.
श्री गणेश याग परिवाराच्या संकेत स्थळावर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देणगी रुपाने दान देण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकेल.