श्रावण शुक्ल एकादशी ही "पुत्रदा एकादशी" आहे. प्रत्येक एकादशीच्या नावामागे काही कथा संदर्भ आहेत तशी ह्या ही एकादशीच्या नावामागे एक कथा आहे. सुकेतु राजाने आपल्या पत्नीसह पुत्र प्राप्तीसाठी ह्या एकादशीला हे व्रत केल्याचा पौराणिक संदर्भ आहे. म्हणून ही पुत्रदा एकादशी.
परंतु आपली संस्कृती सम्रुद्ध आणि व्यापक विचारांची आहे. एकादशीचे व्रत करताना स्वतःला मुलगाच किंवा मुलगी प्राप्त होऊ दे असा संकुचित विचार असणे योग्य नाही. संत संगतीच्या पहिल्या सत्रात एकादशीची उत्पत्ती त्रिदेवांच्या सात्विक ऊर्जेतून झाली हे आपण जाणले आहे. आणि संत ज्ञानेश्वरांना आपण माउली म्हणतो म्हणजे आपण सर्व भक्त त्यांना लेकरांसारखेच आहोत. ह्या विचारांच्या आधारे आपणही पुत्रदा एकादशीला माझ्या कुटूंबाचे, माझ्या मुलांचे कल्याण होऊ दे अशी सकाम भक्ति न करता सध्याच्या वैश्विक संकटातून सर्व मुला, मुलींचे संरक्षण होऊ देत आणि ही भावी पिढी शारीरिक, वैचारिक आरोग्यासहित उज्वल प्रगती करू देत अशी प्रार्थना केली तर खऱ्या अर्थाने संत संगती सुरु झाली हे आपल्या मनाला पटेल.
एकादशीचे नाव फक्त त्या महिन्याच्या संदर्भासाठी आहे असे समजून त्या दिवशी विष्णू पूजन, श्रीहरि कथा, कीर्तन आणि जमल्यास उपोषण हा परिपाठ समाधानकारक राहील.
आषाढी एकादशी पाठोपाठ 'गुरू पौर्णिमा/ व्यास पौर्णिमा’ साजरी केली जाते. महर्षि व्यासांनी वेदांची पुनर्रचना केली त्यामुळेच त्यांना व्यास हे नाव मिळाले. ४वेद, सर्व शास्त्रे, १८ पुराणे, महाभारत, काही सुंदर स्तोत्रे ही महान ग्रन्थ संपादना आपल्यासाठी तयार केली. म्हणूनच "व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम" (जगातील सर्व विषय व्यासांनी पूर्वीच स्पर्शिले आहेत) असे म्हणले जाते. त्यांच्या ह्या अलौकिक प्रतिभेला वंदन करण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणले जाते. गुरू पूजन करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. पारमार्थिक मार्गावर अध्यात्मिक गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपली निर्णायक दिशेंने वाटचाल सुरु होते. आपल्या जीवनात गुरूंचे स्थान अनन्य साधारण आहे. असे समजले जाते की भगवान शंकर हे आदि गुरु आहेत आणि पुढे ही गुरु परंपरा आज तागायत वेगवेगळ्या शाखां मधून अव्याहत सुरु आहे.
ह्या एकादशीला आपण नाथ संप्रदायातील गुरु परंपरेतील संत ज्ञानेश्वरांचे साधक अनुयायी स्वामी स्वरूपानंदांचा सत्संग अनुभवणार आहोत.
महाराष्टातील रत्नागिरी शहरापासून ८ मैल अंतरावर पावस हे निसर्गरम्य ठिकाण आहे. गौतमी नदीच्या तीरावर असलेल्या ह्या पावस च्या भूमी मध्ये (मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके १८२५) १५ डिसेम्बर १९०३ ह्या दिवशी रामचंद्र विष्णुपंत गोडबोलेंचा जन्म झाला. जे गीतेच्या अभ्यासपूर्ण अनुकरणाने "स्वामी स्वरूपानंद" ह्या संत पदाला पोहचले.
स्वामींजींच्या घराण्याचा पूर्वीपासूनच नाव लौकिक होता. त्यांचे पूर्वज पौरोहित्य करीत होते. आजोबा पर्शरामपंत शिक्षण खात्यामध्ये अधिकारी होते. घरी नेहमी अतिथी अभ्यागतांचे वास्तव्य असायचे. त्यांच्या आजी नकळत घडलेल्या अपराधाचे प्रायश्चित घेण्याच्या निमित्ताने अनेक वर्ष नर्सोबाची वाडी ह्या पुण्य क्षेत्रामध्ये साधना करीत होत्या. स्वामीं चे वडील विष्णुपंत आणि मातोश्री रखमाबाई दोघेही परमार्थामध्ये मन रमवणारे होते. मानमान्यतेच्या पोकळ गोष्टींची त्यांना अजिबात आवड नव्हती. दिवसामधील अधिकतर वेळ ते परमेश्वर चिंतनात रमत असत. विष्णुपंत पावस येथील स्वयंभू विश्वेशाची अनन्य भक्ति करीत असत. अशा ह्या तपस्येच्या वातावरणात स्वामींचे बालपण भक्ति, निष्ठेचे संस्कार ग्रहण करीत होते. त्यांचे शालेय शिक्षण सुरु झाले तेंव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेची व्याप्ती दिसू लागली. सर्व विषयामध्ये ते पारंगत होतेच आणि संस्कृत विषय विशेष आवडीचा होता. संस्कृत विषयात त्यांची प्रगती अप्रतिम होती. त्यामुळे त्यांना देवादिकांच्या गोष्टी आणि श्रीमद् भगवद् गीता अध्ययनाची गोडी निर्माण झाली.
I बाल्यापासूनि गीताध्ययनी होता मज बहु छंद I असे स्वामींनी नमूद केले आहे.
पावस, रत्नांगिरी येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता ते मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात गेले होते. तो काळ पारतंत्र्याचा होता. ब्रिटीश राजवट नको असल्याने तरुणांमध्ये स्वातन्त्रासाठी प्रयत्न करण्याचा उत्साह होता. मुंबईमधील शिक्षण पूर्ण होण्या पूर्वी स्वामींनी टिळक विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देऊन ते महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत सामील झाले. ह्या शैक्षणिक कालखंडातही त्यांचे अध्यात्म विषयाचे वाचन, श्रवण, निदिध्यासन अखंडपणे सुरु होते. लहानपणापासून केलेल्या भगवद् गीतेच्या अभ्यासाचा त्यांच्या मनावर प्रभाव होता. धर्माच्या स्थापनेसाठी कर्तव्य करीत राहिले पाहिजे. मात्र ह्या कर्तव्याच्या फलाची अपेक्षा करावयाची नाही, हे तत्व जाणून राष्ट्रोध्दारासाठी तरुणांना स्वावलंबन शिकवले पाहिजे ह्या विचाराने स्वामींनी पावस येथे ‘स्वावलंबनाश्रम’ सुरु केला. ह्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा सोबत स्वावलंबनासाठी मार्गदर्शन केले जात होते. समाजातील नीतिमूल्ये वाढवण्यासाठी तळमळीने आणि स्वखर्चाने हे काम स्वामी करीत होते. समाजात अध्यात्माची गोडी वाढवण्यासाठी ते प्रवचने करीत होते. त्यांच्या ह्या कार्याने समाजात त्यांना एक आदराचे स्थान तयार झाले होते.
राष्ट्रभक्तिच्या प्रेरणेसोबत मनामध्ये सद्गुरू कृपेची तीव्र तळमळ सुरु होती. १९२३ साली त्यांचे मामा केशवराव गोखले त्यांना घेऊन पुण्याला बाबा महाराजांकडे दर्शनाला गेले. त्या भेटी मध्ये शिष्याची ही मनोकामना गुरुंनी जाणली. नाथ संप्रदायातील बाबा महाराज गणेशनाथांनी त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर गुरुंनी त्यांना “स्वरूपानंद” ह्या नावाने संबोधन केले.
जे विश्वरूपामध्ये स्वरूप पाहतात आणि स्वरूपा मध्ये विश्वरूप पाहतात ते स्वरूपानंद.
त्यानंतर स्वामींची वृत्ती अध्यात्मामध्ये अधिकच रमू लागली. देशहितासाठी सामाजिक बांधिलकी आणि आत्मोन्नत्तीसाठी पारमार्थिक प्रगती दोन्ही गोष्टी सुरु होत्या. गांधीजींच्या सोबत मिठाच्या सत्याग्रहात स्वामी सामील झाले होते. त्यामुळे १९३२ मध्ये त्यांना कारावासात ठेवले होते. स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी पुढे त्यांच्या जन्म-शताब्दीला टपाल खात्याने त्यांचे चित्र असलेले तिकीट मुद्रित केले होते. जेल मधील एकांत हा त्यांच्यासाठी इष्टापत्ती होती. त्या वेळेत देह बुद्धी कडून आत्म बुद्धीकडे जाण्याचा मार्ग त्यांनी समजून घेतला. आणि इथेच सोsहं साधनेची सुरवात झाली.
अनुग्रहानंतर स्वामींनी संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून गुरुंना अर्पण केली. ज्ञानेश्वर माउलींच्या गुरु परंपरेतून सुरु असलेल्या तत्वांचा प्रसार २० व्या शतकात सुरू ठेवला. गीतेच्या मूळ ७०० श्लोकांवर ज्ञानेश्वरांनी ९००० ओव्यान्ची ज्ञानेश्वरी लिहिली आणि स्वामींनी तोच आशय कायम ठेवून जवळपास २०,००० ओव्यामध्ये अभंग ज्ञानेश्वरी लिहून कर्म योग, ज्ञान योग आणि भक्ति योग जन मानसात पोहचवला.
पुढे १९३४ च्या सुमारास त्यांची प्रकृती ठीक नव्हती. सामान्य माणूस आजारी पणात दुखण्याची चिंता करतो, असामान्य माणसे ईश्वर चिंतनात मग्न होतात. प्रारब्ध भोग सर्वांनाच असतात तेंव्हा काळजी करण्या पेक्षा काळजी घेणे हे जमले पाहिजे. साक्षात मृत्यू समोर दिसत असताना स्वामी सोsहं साधनेने निर्भय झाले. सोsहं (स:+अहं) तो परमात्मा मीच आहे. अशी दृढ श्रद्धा मनात ठेवायची, आसनस्थ होऊन, आपल्या श्वासावर लक्ष पूर्ण केंद्रित करुन साक्षेपे म्हणजे निवांत चित्ताने ध्यान धारणा केली असता देह बुद्धी वरून (मी, माझे नाव, माझा देह म्हणजे देह बुद्धी आणि मी म्हणजे आत्मा ही आत्मबुद्धी) हळू हळू आत्म बुद्धीची जाणीव होऊ लागते. स्वामींनी ही साधना केली, तपश्चर्या केली. ह्या साधना काळामध्ये त्यांना सगुण साक्षात्कार झाला. ज्या तपश्चर्येचा त्यांनी स्वतः आनंद घेतला त्याच सोsहं संप्रदायाच्या साधनेच्या तत्वज्ञानाचा प्रसार स्वामींनी केला. ते तत्वज्ञान आजच्या काळात झेपेल असे सोपे करून सांगितले.
ते सांगतात, सतत अनुसंधानाने आपले स्वरूप साक्षीत्वाने ओळखता यायला पाहिजे.
अंतरी सतत करी सोsहं ध्यान । न जाई गुंतुन संसारात । धन,सूत,दारा असू दे पसारा । नको देऊ थारा आसक्तीते ।
त्यांच्या शिकवणी मध्ये भक्ति, नाम आणि सोsहं साधना ह्यांच्या जोडीने भेद भाव न करण्यासाठी पण उपदेश आहे.
एका अभंगात ते सांगतात - भेद भाव मळ गोळा अमंगळ । भेदा भेद धर्म बंधनाच्या पलीकडे ।
राष्ट्र सेवा, अध्यात्मिक साधना, गीतेचा, संत वाङ्गमयाचा अभ्यास हाच स्वामींचा प्रपंच होता. ते गृहस्थाश्रमात रमले नव्हते. कौटुंबिक बंधने तशी नव्हती तरी १९३५ साली त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला. सध्याचे कोकण मेव्याचे/हापूस आंब्याचे प्रसिद्ध उद्योजक श्री देसाई ह्यांच्या आग्रहाने त्यांच्या पावस येथीलS ‘अनंत निवास’ मध्ये वास्तव्य केले. ह्या एका वास्तूत एकाग्रतेने त्यांनी एक वाङ्गमय सृष्टी निर्माण केली. गीतेवरील ‘भावार्थ गीता’ हा साकीबद्ध अनुवाद प्रथम लिहीला. अनेक अभंगाच्या रचनेची ‘संजीवनी गाथा’ लिहीली. ह्या दोन प्रासादिक ग्रंथांच्या प्रकाशनानंतर जाणकर लोकांना त्यांचे व्यक्तिमत्व भावले, लोकसंग्रह वाढला आणि सन्मानाने ते स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे ज्ञानेश्वरी, अमृतानुभ, चांगदेव पासष्टी ह्या माउलींच्या ग्रंथांचा अभंग अनुवाद केला तसेच नाथ संप्रदायाच्या ग्रंथांचा अभ्यास करून सुलभ ग्रंथ संपदा तयार केली आणि ह्या प्रासादिक ज्ञानाचा प्रसाद मुक्त हस्ताने वाटला. स्वामी सुहृद भक्तांना पत्रे लिहीत असत. त्या काळात संपर्काचे चे ते पण एक साधन वापरात होते. ‘स्वरूप पत्र मंजुषा’ म्हणून ओवी बद्ध पत्रांचा तो संग्रह प्रसिद्ध आहे. एका पत्रात त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ काव्य संग्रहातील संदर्भ दिला होता.
I विपदि मोरे रक्सवा कोरो I
‘परमेश्वरा विपत्तीत माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. मला विपत्तीत न भीता, चित्त स्थिर ठेऊन काम करण्यासाठी शक्ती दे’. ते पुढे सांगतात की – ‘संसारात काही कर्तव्ये दुःख सोसून करावी लागतात. ती ही स्थिर मनाने करावीत’.
सुहास वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण एवं षडविध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश ।
सज्जनांच्या ह्या सहा गुणांना अंगिकारण्यासाठी ते आग्रही असत. स्वामींच्या ह्या शिकवणीमध्ये त्यांनी स्वतः आणि इतर ही संतांनी भक्ती योगाने जे प्रत्यक्ष अनुभव घेतले त्याचे सार आहे. पुढील एकच श्लोक संस्कृत, प्राकृत आणि मराठी मध्ये क्रमा क्रमाने दिला आहे. गीते मधील तत्वज्ञान हे संत आपल्याला सहज पणे कसे उलगडवून दाखवतात त्याचे हे सुंदर उदाहरण आहे.
या ज्ञानभक्ति सहज । भक्तु एकवटला मज । तो मीचि केवळ हें तुज श्रुत ही आहे| (ज्ञानेश्वरी १८-११३०)
ज्ञान भक्तीनें हया । भक्त जो स्वभावें । एकत्वासी पावे । माझ्या ठायीं । मी चि तो केवळ ।होवोनिया राहें ।ठावे तुज आहे| आघवे हें । (अभंग ज्ञानेश्वरी १८-१९३८)
स्वरुप -आंनद –म्हणजे--स्वतःमधील आत्मरुप ओळखून आंनदाने निष्काम कर्म करणारे हे कर्मयोगी होते. १५ ऑगस्ट १९७४ या दिवशी स्वामींनी महासमाधी घेतली. पावसला त्यांचा जन्म ज्या वास्तु मध्ये झाला होता त्या परिसरात समाधी मंदिर आहे. त्या मंदिरात त्यांच्या तत्व मार्गदर्शना प्रमाणे भक्ति पूर्ण भावाने साधना, ध्यान धारणा, अन्नदान आणि सामाजिक सेवा सुरु आहे.
ह्या एकादशीला आपण स्वामींच्या शिकवणी प्रमाणे भावी पिढीच्या उन्नतीसाठी, त्यांच्या स्वावलंबन युक्त भविष्यासाठी, व्रत करूया आणि संत संगतीची वारी पुढे नेऊया.
ह्या वारी मध्ये एक विशेष पर्वणी आहे. श्री गणेशयाग परिवाराने देशो देशीच्या गणेश भक्तांसह 'अथर्वशीर्ष' पठणाचा संकल्प केला आहे. करोना संकट निवारण होण्यासाठी विश्व कल्याणाची प्रार्थना करायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी दररोज शक्य असेल तर २१ वेळा २१ ऑगस्ट पर्यंत अथर्वशीर्षाचे पहिले १० श्लोक प्रार्थनापूर्वक म्हणायचे आहेत. आपण निष्काम भक्ति करीत आहोत त्यामुळे फलशृती म्हणायची आवश्यकता नाही. विघ्न हर्त्या श्रीगणेशाच्या चरणी संकल्प पूर्तीसाठी विशेष प्रार्थना.