SGYP Blog (Relaunched with English & Marathi Audio feature) : संत ज्ञानेश्वर

*|MC:SUBJECT|*
View this email in your browser
(Click above to open)
SGYP Blog (English Audio Narration) : संत ज्ञानेश्वर
(Click above to open)
SGYP ब्लॉग  (मराठी ऑडिओ कथन) - संत ज्ञानेश्वर
SGYP Blog (Marathi Audio Narration) - : संत ज्ञानेश्वर
Facebook
Website
Email
YouTube

संत ज्ञानेश्वर

- सौ जयश्री काजरेकर


पूर्व संकल्पाप्रमाण ९/१0 (कॅनडा/भारत) जुलै च्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण संत संगतीचा सत्संग करणार आहोत. आषाढी एकादशी, उपवास आणि वारी ह्या तीन गोष्टी एकाच श्रद्धेने निगडित आहेत. ती म्हणजे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची ओढ. ह्या एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू, क्षीरसागरात शेष शय्येवर झोपी जातात म्हणून ह्या एकादशीला ‘देव शयनी’ एकादशी हे नाव आहे.
 
एकादशी संबधी एक पौराणिक कथा आहे. ‘मृदूमान्य’ नावाच्या शिवभक्त दैत्याने भगवान शंकरांकडून अमर राहण्यासाठी एक वर मागून घेतला. आपला मृत्यू कोणा पुरुषा कडून होणार नाही हा वर मिळताच त्या दैत्याने सर्व देवांना पराभूत करण्याचे ठरवले. तेंव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश एका गुहेत एकत्रित झाले. ह्या त्रिदेवांनी काहीही न खाता उपोषण केले आणि त्यांच्या ऊर्जेने एक शक्ती तयार केली आणि तिला एकादशी हे नाव दिले. ह्या एकादशी ने उन्मत्त मृदूमान्य दैत्याला ठार मारले. त्या एकादशीच्या स्मरणार्थ ह्या त्रिदेवांच्या उपासनेसाठी  हे व्रत सुरु झाले.
 
ह्या व्रतामध्ये विठ्ठल/विष्णू पूजन, उपवास आणि भजन-कीर्तन केले जाते. उपवास हा शब्द संस्कृत ‘उपविश' म्हणजे जवळ बसणे ह्या शब्दापासून आलेला आहे. हे बसणे गुरुच्या सन्निध बसून काहीतरी पारमार्थिक ज्ञान प्राप्त करणे अशा अर्थी आहे. एकादशीच्या उपोषणा सोबत आपणही उपासनेच्या मार्गाने संत शिकवणीचे चिंतन करु शकतो.
 
आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शना साठी पंढरपूरला आज जी लाखो वैष्णवांची वारी जाते ती शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे. पूर्वी विठ्ठलपंत (ज्ञान देवांचे वडिल), ज्ञानदेव, तुकाराम आणि नारायण (तुकारामांचा मुलगा) हे विठ्ठल दर्शनाला जात असत. आज त्याच परंपरेने लाखो वारकरी/वैष्णव आळंदी पासून उन्हा पावसाची तमा न बाळगता दिंड्या पताका घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने चालत पंढरपूरला जातात. ही वारी हे जगातले एक अद्वितीय आश्चर्य आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे. अनेक ठिकाणचे, अनेक पंथाचे, अबाल वृध्द्व एकाच अध्यात्मिक शक्तिने ह्या वारीमध्ये सहभागी होतात. संतांना अपेक्षित असलेली समानता इथे आहे. वारकरी प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहतात, एकमेकांना माऊली म्हणून हाका मारतात. ही मानवता आहे. माणूस म्हणून एकमेकांना जवळ आणण्याची क्षमता वारी मध्ये आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विठ्ठलावरची/परमेश्वरावरची नितांत श्रध्दा आणि त्यायोगे सकारात्मक विचारांची मानसिकता होय. विश्व कल्याणाची तळमळ असणाऱ्या ज्ञानदेवांनी ह्याच हेतूने हा पायंडा सुरु केला असावा असे समजले तर योग्यच होईल.
 
त्या निमित्ताने ही संत संगती आपण संत शिरोमणी ज्ञानदेवांच्या कीर्तनाने (जे कीर्ती सांगते ते कीर्तन) सुरु करुया.
 
ज्ञानदेवांची थोरवी सांगताना नामदेव म्हणतात-

ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।। जेणे निगमवल्ली प्रगट केली ।।
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।। ब्रम्हानंद लहरी प्रगट केली ||

 
ज्ञानेश्वरांनी निगमवल्ली प्रगट केली ह्या एका वाक्यात त्यांचा सार्थ गौरव केला आहे. निगम म्हणजे 'वेद'. हे जगातील प्राचीनतम वाङ्गमय आहे. हे खरोखरी ज्ञानाचे भांडार आहे. ह्या मध्ये विश्वाचे मूळ स्वरुप, देवता, यज्ञ, मानवाचे सत्य स्वरूप इतिहास, भूगोल, वेगवेगळी शास्त्रे असे अनेक विषय आहेत. अशा अनेक प्रकारच्या शास्त्र शुद्ध ज्ञानाचा हा विशाल खजिना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये विस्तारीत केलेला आहे. आणि अशा ह्या निगमाची, वेदांची वल्ली म्हणजे वेल ज्ञानदेवांनी प्रगट केली म्हणजे, आपल्याला त्याचे स्वरूप सांगितले.
 
ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे अतिशय वैराग्यशाली, धर्म परायण हरिभक्त होते.

नित्य हरिकथा नाम संकीर्तन संतांचे दर्शन सर्वकाळ ।।

असा त्यांचा दिनक्रम होता. प्रापंचिक संसारात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते. म्हणून विरक्तीच्या भावनेने त्यांनी संन्यास घेतला होता. परंतु गुरु आज्ञेने ते संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात परत आले. ही गोष्ट त्या कालातील जन रूढींच्या विरुद्ध होती. त्यांचे आप्त, स्नेही सुद्धा त्यांची उपेक्षा करु लागले. त्या काळात ते जन नींदेचा विषय झाले होते. सर्व लोकांनी त्यांना वाळीत टाकले. अतिशय विपन्न अवस्थेत हे पति पत्नी गावाच्या बाहेर राहू लागले.
 
परंतु ह्या कालावधीत विठ्ठलपंतांनी एकाग्रतेने वेद वाङ्गमय, धार्मिक ग्रंथ, संत चरित्रांचे भरपूर वाचन केले. आणि हीच त्यांची साधना त्यांच्या चारही ज्ञानजन्य मुलांच्या ज्ञानार्जनाचा ज्ञानसागर झाली. ह्या पारमार्थिक तपाच्या अखेरीस त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली.
 
शालिवाहन शके अकराशे नव्वद । निवृत्ति आनन्द प्रगटले
त्र्याणवाच्या साली ज्ञानेश्वर प्रगटले I सोपान देखिले शाणणवात
नव्याणवाच्या साली मुक्ताबाई देखीली I जनी म्हणे केली मात त्यांनी (संत जनाबाई अभंग २७७)


जनाबाईंनी ह्या भावंडांचा जन्मकाल त्यांच्या अभंगामध्ये असा सांगितला आहे.
 
बाह्य परिस्थिती प्रतिकूल असताना चारही मुलांवर विठ्ठलपंतांनी अतिशय उत्तम संस्कार केले होते. सहानुभूति शून्य वातावरणात ह्या भावंडांनीही उत्तम प्रकारे विद्याभ्यास केला. परंतु समाज ह्या निष्पाप मुलांचे दर्शन सुध्दा अपशकुन समजत असे. ह्या मुलांचे उपनयन संस्कार करण्यासाठी देखील कोणी तयार नव्हते.
 
आपल्या मुलांच्या हाल अपेष्टा बघून आणि त्यांच्या भविष्याच्या काळजीने विठ्ठलपंत चिंतेत होते. ह्या असाह्य परिस्थितीतून काही तरी मार्ग काढण्यासाठी त्यांनी ब्रह्मवृन्दाची सभा बोलवली आणि क्षमा प्रार्थना केली. त्याचा तोडगा म्हणून त्या निर्दयी भावना शून्य लोकांनी त्यांना देहान्त प्रायश्चित्त सांगितले; आणि मुलांच्या कल्याणासाठी विठ्ठलपंतांनी ते स्वीकारले. अगदी लहान वयात ह्या मुलांचे आई-वडिलांचे छत्रच हरवले. तरीही ह्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न सुटला नव्हता. म्हणून निवृत्तीनाथांनी तोच प्रश्न विचारल्यावर लोकांनी त्यांना परत पैठणला जाऊन तेथील ब्रह्मवृन्दाचा निर्णय आणायला सांगितला.
 
हे चौघे जण पैठणला गेले. तेथे सभा बोलावली असताना स्वतःला विद्वान समजणारे काही लोक ह्यांची टिंगल करीत होते. “ह्या गावात ‘ग्याना’ नावाचा एक रेडा पण आहे. नाव ज्ञाना/ग्याना असले म्हणून काय कोणी ज्ञानी होतो का?” असे त्या निर्बुद्धांनी म्हणताच ज्ञानेश्वर अतिशय नम्रपणे म्हणाले की तुम्ही म्हणता ते खरे आहे. “बोलवा त्या रेड्याला. त्या रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. मी ऋग्वेदातील ज्या ऋचा म्हणेन त्याच ऋचा तो रेडा म्हणेल”. ज्ञानदेवांनी ज्या ऋचा म्हणल्या त्याच ऋचा रेडयाने म्हणल्या आणि सभेमधील उपस्थितांना, सर्व पैठणकरांना ह्या भावंडांचे सामर्थ्य समजले. ह्या योगी, ज्ञानी मुलांना प्रायश्चित्त काय आणि कशा करिता द्यायचे असाच विचार ब्रह्मवृन्दानी केला आणि त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना शुद्धिपत्र दिले.
 
हे परलोकीचे तारूदेवत्रय यासी । प्रायश्चित्त काय यासी द्यावे कोणी ।।
 

असा आशय नामदेवांनी दिला आहे.
 
वेद व्याख्यान, हरि कीर्तन, पुराण कथन करणे असा ह्या चारही जणांचा दिनक्रम सुरु असे. म्हाळसापूर, नेवासे येथे एका मुक्कामात शके १२१२ मध्ये ज्ञानदेवांनी श्रीमद्भगवत गीतेवरील टीका सांगितली आणि ती ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिखित प्रत तयार झाली. श्रीमद् भगवतगीता ही अध्यात्म आणि तत्वज्ञानाचे सर्वोत्तम सार आहे. हीच्या वाचनाने जीवन कसे जगावे ह्याचे मार्गदर्शन होते. ज्ञान प्राप्तीने समाधान मिळते, आनन्द मिळतो म्हणून गीतेला ‘योगोपनिषद’ असे म्हणले जाते. परंतु संस्कृत भाषेमधील हे शास्त्र, काव्य, विद्या, संवाद सर्व सामान्य माणसांनाही वाचता यावे व सहज पणे समजून त्याचा लाभ व्हावा ह्या हेतूने ज्ञानदेवांनी सुमारे ९००० ओव्यांचा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला.
 
ज्या समाजाने अपमानास्पद वागणूक दिली, ज्या समाजाच्या अवहेलनेने आई वडिलांनी देहत्याग केला त्याच समाजासाठी हे लेखन करताना ज्ञानदेवांचा उदात्त हेतू आणि निर्मल मन प्रतिबिंबित होते. ज्ञानेश्वरी मध्ये भक्ती रस आहे, अद्वैत अनुभूती आहे आणि अज्ञान नाहीसे होऊन परमानंद प्राप्ती हे प्रयोजन आहे. हे सखोल विचारांचे, भावनांचे भांडार आहे असे नामदेव म्हणतात.
 
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी ।।
 
ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त ज्ञानदेवांनी इतरही लेखन केले आहे. गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञे वरुन ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ सुद्धा लिहिला. अमृतानुभव ग्रंथामध्ये जीव आणि परब्रह्म ऐक्याचे शुद्ध तत्वज्ञान सांगितले आहे. नामपाठासाठी हरी पाठाचे अभंग आणि इतरही अनेक अभंग लिहिले आहेत.
 
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले तेंव्हा ही अद्भुत घटना सर्वदूर पसरली होती. त्या काळात चांगदेव महाराज प्रसिद्ध होते. योग बळाने १४०० वर्षे आयुष्य लाभलेल्या चांगदेवांच्या कानावर ही बातमी गेली. तेंव्हा ह्या महान विभूतीला भेटावे असे त्यांच्या मनात आले. भेटी पूर्वी आपण येत असल्याचे कळवण्यासाठी त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहिले. ते आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत तेंव्हा पत्राची सुरवात नमस्कार का आशीर्वाद उल्लेखाने करावी ह्या संभ्रमात त्यांनी पत्र कोरेच पाठवले.
 
त्या पत्राच्या उत्तरासाठी ज्ञानदेवांनी जे ६५ ओव्यांचे अहंकार नष्ट करणारे लेखन केले. ते लेखन ‘चांगदेव पासष्ठी’ नावाने प्रसिद्ध आहे. चांगदेवा तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती ह्या पत्रा मध्ये लिहिली आहे. तिच्या साहाय्याने तू आत्मस्वरूप जाणून घे आणि मी ब्रह्मस्वरूप आहे ह्या बोधाने तू आनंदात राहा असा आशय त्या मध्ये आहे. चांगदेव वाघावर बसून, हातात सापाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांना भेटायला आले. तेंव्हा ज्ञानदेव त्यांच्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसले होते. चांगदेव समोर दिसताच ज्ञानदेवांनी ती निर्जीव भिंत चालवत त्यांच्या दिशेने नेली. हे पाहून चांगदेवांचा सर्व अहंकार संपला आणि ते ज्ञानदेवांना शरण आले.
 
ज्ञानदेवांचे मराठी भाषेवर खूप प्रेम होते.
माझा मराठीचि बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजांसी जिंके I ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।। (ज्ञान. . -ओवी १४),
अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान व मराठीची महती व्यक्त केली आहे.
 
ज्ञानदेवांच्या भाषेत अलौकीक सौंदर्य आहे. उदात्त विचार आणि अध्यात्मिक एकतेचे बीज आहे. त्यांचे सर्व वाङ्गमय हे अक्षर वाङ्गमय आहे. म्हणजे अनंत काळासाठी मौलिक आहे.
ज्ञानदेवांनी सर्वतोपरी समाज हितासाठी प्रबोधन केले आहे. त्या यादव काळामध्ये अनेक धर्मपंथ होते. शिवाची उपासना करणारे ‘शैव’, विष्णूची उपासना करणारे ‘वैष्णव’, देवीची उपासना करणारे ‘शाक्त’ आणि इतरही अनेक पंथ होते. आणि प्रत्येक पंथाचे लोक एकमेकांना विरोध करत संघर्ष करीत होते. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी "हरिहर" ऐक्याची संकल्पना सांगून ही एकाच परमेश्वराची रूपे आहेत हे पटवून दिले. आणि संघर्ष नाहीसा केला. तसेच, स्त्रिया आणि शूद्रांना फारच बंधन कारक वागणूक दिली जात होती. ज्ञानदेवांनी ह्या विषमता वादाला विरोध केला. सर्व स्तरातील स्त्री पुरुषांना भक्तिचा अधिकार आहे हे सांगून अध्यात्मिक न्याय मिळवून दिला आणि साधी सोपी उपासना सांगितली. आज पंढरपूर वारी मध्ये सर्व पंथातील स्त्री-पुरुष तीच साधी सोपी उपासना मनापासून करतात. एकादशीला प्रत्यक्ष मंदिरात जाणे जमले नाही तरी ‘कळस दर्शनात’ विठ्ठल दर्शनाचा आनंद मानतात. निकोप सामाजिक एकतेसाठी ज्ञानदेवांचे हे मोठे योगदान आहे.
 
ह्या सर्व कार्या नंतर आपले इहलोकीचे कार्य पूर्ण झाले असे वाटून ज्ञानदेव पंढरपूरला गेले आणि श्री विठ्ठलाकडे समाधी घेण्याची परवानगी मागितली. त्यांच्या ह्या निर्णयाने सर्वांना अतीव दुःख झाले.
 
 ज्ञानेश्वर आळंदीला आले. इंद्रायणी नदीच्या काठी, सिद्धेश्वर मंदिरा समोर समाधी स्थान निश्चित केले आणि समाधी घेण्यापूर्वी त्यांनी अतिशय निश्चल वृत्तीने १०९ ओव्यांची श्री भगवंताची स्तुती केली. वयाच्या २१ व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला ह्या ज्ञानेश्वर माउलींनी संजीवन समाधी घेतली. आजही तेथे त्यांच्या शुद्ध सात्विक अध्यात्मिक भक्ती-भावनेची अनुभूती येते.
 
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो I प्राणिजात ||
 
विश्व कल्याणाचे असे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना सर्व भक्त प्रेमाने माउली म्हणतात. आपणही त्यांना वंदन करुया. ह्या आषाढी एकादशीला ज्ञानेश्वर माउलींच्या अनुभवातील वैचारिक वारी ने संत संगतीचा आनंद घेऊया.
 
 तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त गुजेवीण हित कोण सांगे । ज्ञानदेव मार्ग दृष्टांताचि मात साधूचे संगती तरुणोपाय ।।( हरिपाठ -/}

 

 

Copyright © *|CURRENT_YEAR|* *|LIST:COMPANY|*, All rights reserved.
*|IFNOT:ARCHIVE_PAGE|* *|LIST:DESCRIPTION|*

Our mailing address is:
*|HTML:LIST_ADDRESS_HTML|* *|END:IF|*

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

*|IF:REWARDS|* *|HTML:REWARDS|* *|END:IF|*