होळी - हुताशनी पौर्णिमा
“होळी रे होळी, पुरणाची पोळी” किंवा “होली है!”- ह्या शब्दांच्या पाठोपाठ मौज-मजेत, जोशात रंग खेळणाऱ्या लोकांचा समूह डोळ्यासमोर येतो. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण असतो. ह्या दिवसापासून पुढे पाच दिवस "रंगपंचमी" पर्यंत हा आनंदात साजरा केला जातो. महाराष्ट्रात शिमगा/होळी तसेच इतर प्रांतात फगवा, कामदहन, दोलायात्रा अशी वेगवेगळी नावे आहेत पण सण साजरा करण्यातली धमाल मात्र सारखीच आहे. शिशिर ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाळ्याची सुरुवात होत असते. त्यावेळेस थंडीमध्ये दिलेल्या उबदार -उष्णतेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि येणाऱ्या उन्हाळ्यात जास्ती दाहकता जाणवू नये म्हणून अग्निला केलेली प्रार्थना असा दुहेरी भाव ह्या वेळी मनात असतो. त्याचबरोबर मनमोहक रंगांनी निसर्ग फुलवणाऱ्या ऋतुराज वसंताचे हे रंगीत स्वागतही असते.
पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी शक्यतो देवळासमोर किंवा सोयीच्या मोकळ्या ठिकाणी सडा -संमार्जन करुन रांगोळी काढतात. एरंडाच्या झाडाची फांदी मध्ये ठेवून त्या भोवती गोवऱ्या, लाकडे जमवून होळी पेटवतात .
अस्माभिर्भय संत्रस्तॆ: कृता त्वं होलिके यतः I
अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव II
असा मंत्र म्हणून पूजा करतात. होलिकायै नमः अशी प्रार्थना करुन होळी भोवती तीन प्रदक्षिणा घालून होळीमध्ये पुरण पोळीचा नैवेद्य आणि नारळ अर्पण करतात. होळीच्या धगधगणाऱ्या ज्वालां सभोवती रात्री नाच, गाणी विनोद करत लोक मनसोक्त आनंद घेतात. होळी पूर्ण जळल्यावर दूध व तूप शिंपडून शांत करतात.
होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी "धुलीवंदनाला" होळीच्या राखेला वंदन करतात. ही रक्षा कपाळाला लावतात तसेच अंगाला लावून स्नान करण्याची प्रथा आहे. अलिकडे ह्या धुळवडीच्या दिवशी रंग खेळले जातात. आत्ता पर्यंत आपण पाहिलेच आहे कि आपल्या प्रत्येक सण ,उत्सवांना नैसर्गिक परिस्थिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पौराणिक कथांचे संदर्भ आहेत.
पौराणिक कथा १) पूर्वी "ढुंढा" नावाची एक राक्षसीण लहान मुलांना अतिशय त्रास देत असे. तिच्या क्रूर स्वभावामुळे पालकांना मुलांची फार काळजी वाटत असे. ह्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सर्व लोक एकत्र आले. सांयकाळी ढुंढा येण्याच्या वेळेला प्रत्येक घरासमोर होळ्या पेटवल्या. लोक वाद्ये वाजवून मोठे मोठे आवाज करू लागले. काहीजण शंखनाद करू लागले. सगळीकडे अग्नि आणि सभोवताली प्रतिकारासाठी दक्ष असणाऱ्या माणसांना बघून ती घाबरून पळून गेली. लोक आनंदाने होळी भोवती नाचू लागले. तेंव्हा पासून दुष्ट, राक्षसी प्रवृत्तीने मानवी मनामध्ये आणि समाजात प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा सुरु झाली.
२)शिवलीलामृत पोथीमध्ये मध्ये एक कथा आहे. तारकासुर नावाच्या एका दैत्याने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. हैराण झालेल्या सर्वांनी परमेश्वराला हे संकट निवारण करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शंकर आणि पार्वती देवीला होणारा पुत्र तारकासुराला ठार मारेल असे वरदान मिळाले. त्या साठी काय युक्ति करावी अशा अगतिक विचाराने कामदेव आणि त्याची पत्नी रतीने श्री शिव शंकर आणि पार्वती देवीच्या शरीरात प्रवेश करण्याचे ठरवले. ध्यानस्थ असलेल्या शिव शंकरांच्या तपश्चर्येत कामदेवाने विघ्न आणले. त्यामुळे त्यांनी तिसरा डोळा उघडून क्रोधाने मदनाकडे बघितले आणि त्याच क्षणी मदन जळून भस्म झाला. तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा होता. मदनाचे दहन झाल्यावर सर्व शिवगणांना आनंद झाला आणि तेंव्हापासून ह्या दिवशी होळी करण्याची प्रथा सुरु झाली.
३)होळी बद्दल अजून एक भक्त प्रल्हादाची कथा आहे. हिरण्यकश्यपु नावाचा राक्षस होता. ह्या दैत्याच्या मनात देव-देवतां बद्दल राग -द्वेष होता. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णुंचा निस्सीम भक्त होता. तो अतिशय श्रद्धेने विष्णुचे नामस्मरण करीत असे. हिरण्यकश्यपुला हे आवडत नसे. त्याने अनेक प्रकारे प्रल्हादाला तसे न करण्यासाठी धाक दाखवून छळ केला. तरी देखील प्रल्हाद विष्णु भक्ति पासून परावृत्त झाला नाही. म्हणून निर्दयपणाने त्याला ठार मारण्याचे ठरविले. हिरण्यकश्यपुची बहिण होलिका होती. तिला सत्प्रवृत्त लोकांना तिने जर त्रास दिला नाही तर अग्निमध्ये ती जळू शकणार नाही असे वरदान होते. तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून दोघांनाही पेटलेल्या चितेवर-होळीवर बसवले. होलिका त्या चितेमध्ये जळून गेली आणि प्रल्हाद मात्र श्री विष्णुकृपेने अगदी सुखरुप राहिला. पुढे भगवान विष्णुंनी खांबामधून प्रकट होऊन नरसिंह रुपाने हिरण्यकश्यपुला ठार मारले.
थोडक्यात होळीमध्ये दुष्ट वासनांचा, दुष्ट प्रवृतींचा नाश झाल्याच्या ह्या कथा आहेत. आज मितीला, आजच्या जमान्यात असणाऱ्या वाईट गोष्टींची रूपे समजून ,त्त्यांचा नाश करता आला तर सणांचे उद्देश खऱ्या अर्थाने सफल होतील. पहिल्या कथेत ढुंढा राक्षसीण लहान मुलांना त्रास देत होती. आज तीच वेगळ्या रूपात लहान मुलांना त्रास देती आहे. सर्व वयाच्या मुलांना, विद्यार्थांना इंटरनेट आणि स्क्रीनची असलेली अतिरेकी आवड ही त्यांना त्रासच देती आहे. त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेचे जे नुकसान होते आहे त्या साठी आज पालकांना विचार करायला हवा आहे. दुसऱ्या कथेतील मदन अगतिक विचारांनी वाईट काम करतो. आजही चांगल्या कामांमध्ये विघ्न आणणारे अविचारी लोक आहेतच. सदाचारी लोकांना विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेला बाधा आणणारे दैत्य सुद्धा आहेत. तिसऱ्या कथेमध्ये दैत्य कुलामध्ये जन्मलेला प्रह्लाद स्वतःच्या प्रयत्नांनी आदर्श ठरला. युवा पिढीसाठी ह्यातून नक्कीच चांगला संदेश मिळू शकेल. पालकांनी दिलेल्या सोयी आणि सुविधा जेवढ्या मिळतील तेवढ्या असतातच, पण त्या मर्यादांच्या पलीकडे झेपावून प्रगतीसाठी प्रयत्न करता येतात. हा तो संदेश आहे.
समाजातील वाईट परंपरा संपवण्याचा संदेश होळी देते. तसेच वेगवेगळे मोहक रंग नेहमीच आपल्या जीवनात सुंदरता आणतात, सुखद रंग जपण्याचा संदेश देतात. भगवान श्रीकृष्णांनी गोपींसमवेत आणि सवंगड्यांसह हा खेळ खेळल्याचा उल्लेख श्रीकृष्ण कथांमध्ये आहे. धुलिवंदना पासून रंग-पंचमी पर्यंत रंग खेळताना एक वेगळाच आंनद, उत्साह असतो. लाल रंग पावित्र्याचे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतिक आहे. सोनेरी पिवळा रंग चैतन्यदायी आहे तर केशरी रंग वैराग्याची, भक्तीची भावना दर्शवितो. प्रत्यक्षात रंग खेळताना रंग कोणताही असला तरी मनातले हेवेदावे, गैरसमज विसरुन फक्त आणि फक्त आनंदच असतो. हा आनंद सात्विक असतो त्यात नशेची जोड नसावी. वाढत्या वैश्विक ऊष्मांकांमुळे पाऊस - पाण्याची अनिश्चितता लक्षात घेऊन समजूतदार लोक रंग खेळताना पाण्याचा दुरुपयोग टाळतात. तसेच नैसर्गिक रंग वापरुन आरोग्याचीही काळजी घेतात. हा होलिकोत्सव सगळीकडे आनंद निर्माण करतो. सकारात्मक उत्साहाची रंगीत बरसात करतो.
श्री गणेश याग परिवारा तर्फे सर्वाना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळीच्या पवित्र अग्नित प्रगतीला बाधा आणणाऱ्या नकारात्मक विचारांचा नाश होऊ देत.
रंग पंचमीच्या मनोहारी रंगांसारखी नव्या सकारत्मक विचारांनी ध्येय साध्य होऊ देत.