SGYP: Blog post - गुढी पाडवा 2017

ब्रह्मपुराणानुसार ब्रह्म देवांनी ह्या जगाची,ब्रह्माण्डाची निर्मिती चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे "गुढी पाडवा" ह्या दिवशी केली. पृथ्वीवर जीवनचक्राची सुरवात झाली. शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला, तो हाच दिवस. श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून, रावण वध करुन अयोध्येत परतले तो हाच दिवस. त्या वेळेस लोकांनी गुढ्या-तोरणे उभारून विजयोत्सव साजरा केला. हा शालिवाहन शक पध्दती प्रमाणे वर्षाचा पहिला दिवस आहे. नारदांचे साठ पुत्र हीच साठ संवत्सरे होत. ह्या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस ती हीच चैत्र शुध्द प्रतिपदा. ह्या वर्षी सुरु होणाऱ्या संवत्सराचे नाव “हेमलंबी नाम" आहे.

 

धार्मिक रूढी प्रमाणे वेळूच्या काठीवर रंगीत भरजरी कापडाचा ध्वज, कलश, पुष्पमाला, साखरेची गाठी, कडूलिंबाची पाने लावून गुढी उभारतात व "ब्रह्म ध्वजाय नमः" असे म्हणून गुढीचे पूजन करतात.

ब्रह्मध्वज नमस्तेअस्तु सर्वाभीष्ट फलप्रद

प्राप्ते अस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मङ्गलं कुरुII - हा मंत्र म्हणून प्रार्थना करतात.

 

सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन प्रेरणादायी असते. वृक्षवेलींवर नवी पालवी येत असते. सगळीकडे आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरण असते.

गुढी पाडव्याच्या दिवशी विषेशतः सूर्योदयाच्या वेळेस वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘तेजतत्व’ प्रक्षेपित होत असते. ते सात्विक तेज तत्व आपल्या मध्ये सामावून घेण्यासाठी प्रात:समयी, मंगलमय वातावरणात गुढी उभारून पूजा प्रार्थना करावी अशी परंपरा आहे.

 

 ह्या दिवशी विद्यार्थी, ज्ञानोपासक मनोभावे सरस्वतीची पूजा (पाटी-पूजा) म्हणजेच पाटीवर सरस्वती, सूर्य,चंद्र काढून पूजन करतात. नवे पंचांग घेऊन वर्ष-फल वाचतात. कडू लिंबाच्या सेवनाने शरीर तेजस्वी आणि निरोगी राहते म्हणून आरोग्यदायी कडूलिंबाचे सेवन करतात. नूतन वस्त्र- अलंकार परिधान करुन देवदर्शनाला जाण्याची प्रथा आहे.

 

साडे तीन मुहूर्तांपैकी हा एक सुमुहूर्त आहे. नवीन संकल्प, नवीन उपक्रम लोक ह्या दिवशी आरंभ करतात. ह्या मुहूर्तांवर सुरु केलेले कार्य निर्विघ्नपणे यशस्वी होते.

 

नूतन वर्ष निरामयी आनंददायी, आरोग्यदायी जावो. स्वप्न-संकल्प पूर्ती होण्यासाठी श्री सिद्धीविनायकाच्या चरणी मनोमन प्रार्थना.

आपणा सर्वांना श्री गणेश याग परिवारा तर्फे सुख शांती व समृद्धी साठी हार्दिक शुभेच्छा.

 

-- सौ जयश्री काजरेकर