SGYP - Blog : पंचमहाभूते आणि मानवी जीवन

पंचमहाभूते आणि मानवी जीवन

पिंडी ते ब्रह्माण्डी असे बोली भाषेत म्हणले जाते परंतु वास्तवात ब्रह्माण्डी ते पिंडी असे म्हणणे योग्य होईल. त्याचे कारण असे कि पिंड म्हणजे देह आणि ब्रह्म अर्थात शून्य. या शून्यापासुन सृष्टीची रचना झाली. ब्रह्माण्डाची निर्मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा/गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने केली. ह्या निर्मितीच्या प्रक्रियेत जे ब्रह्मज्ञान आहे ते जाणले तर पंचमहाभूतांचे सार्वभौमत्व आपल्याला सहज पटेल.

सृष्टीच्या निर्मितीमध्ये परमात्म्याने आपल्या आत्म्यापासून सर्व प्रथम 'जड' आणि ‘जीव’ ही दोन तत्वे तयार केली.

 तस्माद्वा एतस्मादात्मन आकाश:संभूत:। आकाशाद्वायु: । वायोरग्नि: । अग्नेराप: । अदभ्य: पृथिवी । पृथिव्या ओषधयः । औषधीभ्योअन्नम् । (उपनिषद)

आपल्या आत्म्यापासून ब्रह्मदेवाने आकाश निर्माण केले,आकाशापासून वायु, वायुपासून अग्नि, अग्नि पासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वी पासून औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींपासून अन्न निर्माण केले.

जड तत्वामधुन बुद्धी आणि अहंकार तयार झाल्यावर पुढे जो विकास झाला त्यामध्ये दोन प्रकार तयार झाले. एका प्रकारात आकाश, वायु, तेज, आप (जल) आणि पृथ्वी हि पंचमहाभूते उत्पन्न झाली आणि दुसऱ्या प्रकारात मन, पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. जेंव्हा ह्या दोन्ही शाखांचा संयोग होतो तेंव्हा शरीर तयार होते आणि पुढे ह्या शरीराचा आत्म्याशी (जीव तत्वाशी) संयोग होतो तेंव्हा प्राण्याचा जन्म होतो. अशा प्रकारे ब्रह्माण्डाच्या आणि आपल्या शरीराच्या निर्मितीमध्ये पंचमहाभूतांचे महत्व आहे.

सृजन कर्त्याने ह्या निर्मिती प्रक्रियेत अनेक प्राणी, वनस्पती, वातावरण, ग्रह, तारे अशा अनेक सजीव आणि निर्जीव गोंष्टींची पण निर्मिती केली आहे. परंतु सौर मंडला मध्ये केवळ पृथ्वी तलावावर सजीवांचे-आपले अस्तित्व आहे, हे आपले भाग्य आहे. अंतराळ संशोधना मार्फत इतर ग्रहांवर जीव सृष्टी आहे का ह्याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत.

आपल्या संतांनी पंचमहाभूते आणि शरीराच्या जडण घडणीत जे साम्य आहे त्यावर सुंदर रचना केल्या आहेत. दासबोधात रामदास स्वामींनी मोठय़ा बहारदार शब्दात हे वर्णन केले आहे. स्वामी लिहितात-

जे जे जड आणि कठीण।

ते ते पृथ्वीचे लक्षण।

मृद आणि वोलेपण।

तितुके आप॥

जे जे उष्ण आणि सतेज।

ते ते जाणवे पै तेज।

आता वायोही सहज निरोपीजे॥

चैतन्य आणि चंचळ।

तो हा वायोजि केवळ।

मुख्य आकश निश्चळ।

आकाश जाणावे॥

हेच जे ब्रह्माण्डी ते पिंडी तत्व. शरीराच्या अंतर रचने मध्ये मांस, हाडे, मज्जासंस्था, जे जडत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. विविध प्रकारे स्त्रवणारे अंत:स्त्राव व रक्त हे आप तत्व आहे. शरीरातील उष्णता हे तेज तत्व आहे. शरीरात चालू असणाऱ्या प्राण, अपान, व्यान, उदान आणि सामान वायुमार्फत सुरु असणाऱ्या क्रिया, श्वासोत्सवास हे वायुतत्व आहे. शरीराच्या अंतर रचने मध्ये जिथे पोकळी आहे - कवटी, नाक, कान, जठर, रक्त वाहिन्यातील पोकळी, अन्ननलिका, आतडे ते आकाश तत्व आहे. अशा प्रकारे पंचमहाभूतात्मक संघटन काय आहे त्यावर आपली प्रकृती ठरते.

ब्रह्मदेवाने पंचमहाभूते निर्माण केली तेंव्हा ती संतुलित राहण्यासाठी प्रत्येक भूताचा अंश इतर चार ही भूतांमध्ये निर्माण केलेला आहे. उदाहरणार्थ जर प्रत्येक भुताचे सोळा गुण आहेत असे गृहित धरले तर समजा आकाश हे तत्व आहे त्याचे आठ गुण आणि उरलेल्या इतर वायु, तेज, आप आणि पृथ्वी ह्या चार महाभुतांचे प्रत्येकी दोन गुण असे एकूण आठ गुण असे एकत्रित करुन आकाश सोळा गुणांचे एक तत्व तयार केले. ह्या संतुलन अवस्थेला ‘पंचीकरण’ अशी संज्ञा आहे. पंचमहाभूतांचे हे व्यवस्थापन फार मोलाचे आहे. अन्यथा त्यांच्या अनिर्बंध प्रमाणाने पृथ्वीवरील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो किंवा प्रलय होऊ शकतो. हे त्या विधात्याने जाणले होते.

आपल्या शरीरातही हीच पाच तत्वे संतुलित राहणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत हे निर्मितीच्या वेळेसच निश्चित झाले आहे. पंचमहाभूतांचे जसे संतुलित प्रमाण ठरवले आहे तशा त्यांच्या मर्यादांचे नियमन ही ठरलेले आहे.

सप्तलोक -- भू:, भुव:, सुव:,मह:, जन:, तप:, सत्यम्

सप्त पाताळ -- अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल

दहा दिशा -- चार मुख्य दिशा -पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर, आणि सहा उपदिशा - आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, उर्ध्व आणि अधर

ह्या बंधनांच्या मर्यादेत पंचमहाभूतांची व्याप्ती आहे.

जसे पंचमहाभूतांना संतुलित प्रमाण आणि मर्यादा आहेत अगदी तसेच नियम मानवी शरीरातील पंचभूतांनाही लागू आहेत. आरोग्यशास्त्रानुसार सर्व साधारणपणे आपल्या शरीरात ७२% आप तत्व, १२% पृथ्वीतत्त्व, ६% वायुतत्व, ४% अग्नी तत्व आणि ६% आकाश तत्व हे संतुलित प्रमाण आहे. ह्या प्रमाणाचे संतुलन जेंव्हा बिघडते तेंव्हा आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात.

शरीरामध्ये नवीन पेशी तयार होण्यासाठी पृथ्वी तत्व कार्य करत असते. अन्न पचनाचे कार्य अग्नी तत्व करत असते, रक्ताभिसरणाचे काम आप तत्व करत असते, श्वसनक्रियेसाठी वायु तत्व कार्यरत असते,आरोग्यपूर्ण मनोव्यापाराठी आकाश तत्व कार्यरत असते. शरीराचे सर्व कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी जी शक्ती वितरण करणारी शक्तीकेंद्रे किंवा षट्चक्रे आहेत त्या ठराविक चक्रांमध्ये ठराविक तत्वांचे स्थान आहे.

मूलाधारचक्र – पृथ्वी तत्व,

स्वाधिष्ठान चक्र -- जल तत्व,

मणिपूर चक्र -- अग्नी तत्व,

अनाहत चक्र – वायु तत्व,

विशुद्धी चक्र -- आकाश तत्व

अशा प्रकारे षट्चक्रांमध्ये पंच महाभूतांची स्थाने आहेत. षट्चक्रांवर केलेल्या शास्त्रशुद्ध ध्यान धारणेचा उपयोग निरामय आरोग्यासाठी होतो हे सिध्द झालेले आहे. आपल्या शरीरात तसेच हातांच्या बोटात अग्निचे प्रतिनिधीत्व हाताचा अंगठा करतो. तर्जनी वायुचे प्रतिनिधीत्व करते. मधले बोट आकाश तत्वाचे प्रतिनिधीत्व करते. अनामिका पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधीत्व करते, आणि करंगळी जल तत्वाचे प्रतिनिधीत्व करते. आपल्या सनातन शास्त्रांमध्ये पूजा-अर्चा करताना ज्या अनेक मुद्रा सांगितलेल्या आहेत त्यामागे आरोग्य विचारांचा आधार आहे. पाची बोटांचा वापर करुन जेवणाची, नैवेद्य दाखवताना केलेल्या मुद्रांची पूर्वापार चालत आलेली पद्धत शास्त्रोक्त आहे.

प्रकृतीमध्ये उत्पन्न झालेल्या तक्रारींवरुन पंचमहाभूतांचे कोणते प्रमाण असंतुलित झाले आहे ते आयुर्वेदशास्त्र आणि इतर हीलिंग थेरपी मध्ये निश्चित करतात आणि त्याप्रमाणे उपाय-योजना करतात. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी जाणकारांनी शास्त्रामध्ये उपयुक्त माहिती दिलेली आहे. चौरस आणि शुद्ध-सात्विक आहार, नियमित व्यायाम, दीर्घ श्वसन, ध्यान-धारणा आणि सुदृढ मानसिकता हे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच आपल्या आरोग्याच्या तक्रांरीसाठी आपण जितके काळजीपूर्वक लक्ष देतो तशीच काळजी पर्यावरणाच्या संवर्धनाची पण घेतली तर खरा परमार्थ होईल. प्रगत मनुष्य भौतिक सुखांच्या मागे धावत आहे. बुद्धीच्या जोरावर नवीन ग्रहांवर जीव सृष्टी आहे का हे संशोधन करण्याची जेवढी जिज्ञासा आहे तशीच प्रायोगिकता आणि प्रयत्न पर्यावरणाच्या संवर्धनासाठी करणे आवश्यक आहेत.

आज जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग), पाण्याचा दुष्काळ किंवा पावसाचा अतिरेक, अनियमित बर्फवृष्टी आणि असेच निसर्ग चक्रातील बदल संपूर्ण जगात अनुभवले जात आहेत. पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी पंचमभुतांचे जे मूळ स्वरुप आणि प्रमाण होते ते बदलत गेल्याने हे दुष्परिणाम अनुभवले जात आहेत. आपण आपल्या स्वःताच्या आरोग्य वर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी सजग होणे गरजेचे आहे. अनेक पर्यावरण प्रेमी संस्था कार्य करत आहेत.  आजच्या  काळात सौर आणि नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधीक वापर, पाण्याची बचत, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण करता येईल.

गर्मी नंतर येणाऱ्या पावसाच्या सरी, समुद्राच्या संथ लाटांचा लयबद्ध आवाज, पूर्ण चंद्र बिंब आणि निरभ्र आकाश अशी निसर्गाची अनेक रुपे आपल्याला जी प्रसन्नता देतात तसेच आपण ही परत काही देऊ केले पाहिजे. पंचमहाभूतांचे संतुलन जपले पाहिजे आणि निसर्ग संवर्धन केले पाहिजे.

श्री गणेशयाग परिवार दरवर्षी वृक्षारोपणा सारखे उपक्रम आयोजित करत असतो त्या मध्ये सहभागी होण्यासाठी आपले सर्वांचे स्वागत आहे.

-सौ. जयश्री काजरेकर